|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हिंगणगादेत शेतमजुराचा वीज पडून मृत्यू

हिंगणगादेत शेतमजुराचा वीज पडून मृत्यू 

प्रतिनिधी/ विटा

दुष्काळी खानापूर तालुक्याला रविवारी रात्री पावसाने झोडपले. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात सोसाटय़ाच्या वाऱयासह आलेल्या पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला. हिंगणगादे येथे किरण शरद मदने (38) यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर पळशी येथे वीज पडून तीन मेंढय़ा दगावल्या. विविध ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱयाने झाडे उन्मळून पडली. तालुक्यात सरासरी 51.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 60 मिलिमीटर पाऊस करंजे येथे पडला.

दुष्काळी खानापूर तालुक्यात गेल्या महिन्यात पावसाची फारशी समाधानकारक हजेरी नव्हती. मोठय़ा वळीवाची तालुक्याला प्रतीक्षा होती. प्रामुख्याने मान्सूनपूर्व आणि परतीच्या मान्सूनच्या पावसावर अवलंबून असणाऱया खानापूर तालुक्यात गेल्या काही वर्षात वळीवाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सहन करीत शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामात नुकसान सहन करीत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर तालुक्यातील काही गावांतून टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. या पार्श्वभूमिवर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाडा वाढल्याने वळीवाची शक्यता वाढली होती.

वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थ हैराण

अशातच सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शहरात सोसाटय़ाच्या वाऱयासह पावसाला सुरूवात झाली. विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱयाने वातावरण बदलून गेले. जवळपास दोन तासापेक्षा अधिक काळ वाऱयासह पाऊस सुरू होता. वाऱयासह पावसाने हजेरी लावली असतानाच वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे उकाडय़ात अधिकच भर पडली. रात्री पावसाने उघडीप दिल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. पहाटेच्या सुमारास पावसाने उघडीप दिली.

तालुक्यात सरासरी 51 मिलिमीटर पाऊस

तालुक्यातील विटा शहरात 59 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लेंगरेत 55 मिलिमीटर, भाळवणीत 55, खानापूर 28 आणि करंजे येथे 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लेंगरे परिसरातील भूड, देविखिंडी, मादळमुठी, भाळवणी परिसरातील कळंबी, ढवळेश्वर, आळसंद, विटा, घाटमाथ्यावरील करंजे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. खानापूर शहर आणि परिसराला मात्र पावसाने हुलकावणी दिली. खानापुरात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. तासभर पावसाने हजेरी लावल्याने तालुक्याला चांगलाच दिलासा मिळाला आहे.

हिंगणगादेत वीज पडून एकाचा मृत्यू

दरम्यान तालुक्यातील हिंगणगादे येथे वीज पडून किरण शरद मदने(38) या शेतमजूर युवकाचा मृत्यू झाला. मदने हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून गावातून जात असताना वादळी वाऱयासह पावसाला सुरूवात झाली. पाऊस सुरू झाल्याने मदने यांनी भगवान भाट यांच्या नवीन घराच्या बांधकामाच्या जिन्याचा आडोसा घेतला. त्या ठिकाणी दुचाकी लावून मदने हे घराच्या पायरीवर मोबाईलवर बोलत उभा होते. त्याचवेळी अचानक मोठय़ा कडकडाटासह वीज त्यांच्या अंगावर कोसळली.

वीजेचा प्रवाह इतका जबरदस्त होता, की घराच्या भिंतीला भगदाड पडले आहे. सोमवारी सकाळी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मदने यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत किरण मदने यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, वडील असा परिवार आहे. या कुटूंबातील एकुलता एक कमवता आधार गेल्याने मदने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पळशीत तीन मेंढय़ा दगावल्या

दरम्यान, पळशी येथे देखिल वीजेच्या धक्क्याने तीन मेंढय़ा दगावल्या आहेत. पळशीतील प्रकाश जाधव यांच्या शेतात हिवतड येथील विठ्ठल शिंगाप्पा काबुगडे या शेतकऱयाच्या तीन मेंढय़ा दगावल्या आहेत. त्यांचे 27 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल कर्मचाऱयांना दिले आहेत, अशी माहिती तहसीलदार रंजना उबरहंडे यांनी दिली.

 

Related posts: