|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चित्रपटगृहाबाहेर पेट्रोलबाँब टाकणाऱया युवकाला अटक

चित्रपटगृहाबाहेर पेट्रोलबाँब टाकणाऱया युवकाला अटक 

@ प्रतिनिधी/ बेळगाव

बहुचर्चित पद्मावत चित्रपटाला संपूर्ण देशभरात विरोध सुरू असतानाच बेळगावातही या चित्रपटाला विरोध झाला होता. विरोध डावलून येथील प्रकाश चित्रपटगृहात या चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी चित्रपटगृहाबाहेर पेट्रोल बाँब टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी बुधवारी खडेबाजार पोलिसांनी खानापूर येथील युवकाला अटक केली आहे.

संतोष तुळजाप्पा गुरव (वय 32, रा. विद्यानगर, खानापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक आर. आर. कल्याणशेट्टी, हवालदार शंकर शिंदे, यल्लाप्पा हत्तरवाट व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. अटकेची कारवाई पूर्ण करून संतोषला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

26 जानेवारी रोजी रात्री प्रकाश चित्रपटगृहाबाहेर बाटलीत पेट्रोल घालून ते पेटवून टाकून देण्यात आले होते. अचानक आगीचा भडका उडाल्यामुळे चित्रपटगृहाबाहेर एकच धावपळ उडाली होती. या प्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात भा.दं.वि. 426, 436, 120 (बी) सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या एक महिन्यानंतर संभाजी मारुती पाटील (वय 28, रा. हलकर्णी, ता. खानापूर) या तरुणाला अटक करण्यात आली होती.

संतोष हा फरारी होता. त्याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. प्रतीक उर्फ पंडित ओगले याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला आहे. त्यामुळे त्याची अटक टळली. या घटनेनंतर संतोष फरारी होता. पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत होते. बुधवारी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस दलाला डोकेदुखीचा ठरला होता. सीसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व खडेबाजारचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी यांनी या प्रकरणाचा छडा लावला होता.

Related posts: