|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मांडवी पुलाचा निम्मा खर्च केंद्र उचलणार

मांडवी पुलाचा निम्मा खर्च केंद्र उचलणार 

प्रतिनिधी/ पणजी

मांडवी नदीवर पणजीत उभारण्यात येणाऱया तिसऱया पुलाच्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम केंद्रीय वाहतूक मंत्रालयातर्फे देण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. तिसऱया पुलाचा अंतिम भाग जोडण्याचे काम काल मंगळवारी गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम मार्च 2019 पूर्वी पूर्ण करण्यात येणार असून मार्चपर्यंत उद्घाटन करण्याची तयारी असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

एकूण 860 कोटी रुपये खर्चाच्या या पुलाचे बांधकाम राज्य सरकारने स्वत:च्या खर्चाने करण्याची तयारी केली होती. मात्र आता आर्थिक टंचाईमुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्र सरकारला विनंती केली. त्यामुळे केंद्र सरकारने 50 टक्के निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. काल गडकरीनी या पुलाची पाहणी केली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राष्ट्रीय महामार्गावरील या तिसऱया पुलाचे बांधकाम करण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती केली होती. राज्य सरकार या पुलासाठी निधी पुरवठा करणार असेही स्पष्ट केले होते. त्याचवेळी आपण त्यांना सूचना केली होती की असे करू नये, पण आता केंद्र सरकार निम्मी रक्कम देणार आहे.

झुआरी पुलाचे काम लवकरच करणार

कुठ्ठाळी – आगशी या झुआरी पुलाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला दिली होती. मात्र भूसंपादन प्रक्रिया व समस्यांमुळे विलंब लागला. मात्र तरीही हे काम लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न चालले आहेत. दिल्लीत 500 दिवसात कंत्राटदार कामे पूर्ण करतात. मात्र या पुलाच्या कामामुळे लोकांना समस्या निर्माण झाली, आपणही याची नोंद घेतली आहे.

राज्य सरकारासमोर भूसंपादनाच्या समस्या

महामार्गाच्या बांधकामासाठी राज्य सरकारासमोर भूसंपादनाच्या समस्या निर्माण होतात. प्रत्येक राज्यात या समस्या आहेत. पर्यावरण, भूसंपादन विषयामुळे बऱयाचवेळा समस्या निर्माण होते, असे ते म्हणाले. आता या कामासाठी निवृत्त अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. तेच आता भूसंपादनाच्या कामकाजावर लक्ष ठेवतात. या कामासाठी आता आणखी अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्ग मार्चपर्यंत पूर्ण करणार

मुंबई-गोवा महामार्गाचे काम मार्च 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मार्चमध्येच या महामार्गाचे उद्घाटन करण्याची तयारी चालविली आहे. कशाळी घाटात एक भुयारी मार्ग आहे. त्या कामाला थोडा वेळ लागेल, असे गडकरी म्हणाले.

महामार्गाजवळ हिरवळ तयार करावी

महामार्गावर हिरवळ तयार करण्याचा प्रयत्न प्रत्येक राज्यात झाला पाहिजे. आपण गोव्यातील लोकांनाही विनंती करीत आहे. महामार्गासाठी झाडे कापली जातात. त्यामुळे पुन्हा नव्याने झाडे लावून हिरवळ जपली पाहिजे. बिगरसरकारी संघटना सामाजिक संघटना, जनता यांनी हे काम करायला हवे, महाराष्ट्रात साडे चार कोटी झाडे लावली आहेत. वनखात्याने हे काम हाती घेतले. गोव्यातही हिरवळ राखण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, तर गोव्याचे सौंदर्य वाढेल, असेही ते म्हणाले.

दोन महिन्यानंतर गोवा-मुंबई बोटसेवा

गोवा-मुंबई जलमार्गावर पुढील दोन माहिन्यानंतर क्रूझ बोटसेवा सुरु होणार आहे. या बोटची चाचणी झाली आहे. आता पावसाळा आहे. त्यामुळे दोन महिन्यानंतर बोटसेवा सुरु होईल. मुंबईत प्रवासी सेवेच्या दृष्टीनेही ही बाब महत्त्वाची आहे. त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीनेही ही महत्त्वाची आहे. मुंबईत एक हजार कोटी खर्चून क्रूझ टर्मिनल बांधले आहे. गोव्यातही क्रूझ टर्मिनल बांधण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.

गोव्य़ात क्रूझ पर्यटन विकसित व्हायला हवे

गोव्यात क्रूझ पर्यटन विकसित व्हायला हवे. पण गोव्याचे बंदर कप्तान खाते नवे नवे नियम समोर आणते, असे ही ते म्हणाले. पर्यावरण ना हरकत दाखले हवे असतात. जेटी बांधकामासाठी या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कराव्या लागतात. रस्त्यावरील वाहतूक कमी करण्यासाठी थेट विमानतळावरून हॉटेलवर जलवाहतुकीद्वारे जाता यावे यासाठी तशा सुविधा निर्माण करण्यावर भर देण्याचा विचार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होते. मात्र अशा प्रकल्पासाठी सरकारचे व जनतेचे सहकार्य हवे. न पेक्षा ज्या कंपनीला काम दिले जाते ती कंपनीही काम करायला तयार होत नाही. विकास साधायचा असेल तर त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

चार वर्षांत 10 लाख कोटींची कामे सुरु

मागील चार वर्षांच्या कारकिर्दीत 10 लाख कोटीपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामाची कंत्राटे दिली आहेत. या शिवाय भारतमाला प्रकल्प ज्यावर 7.5 लाख कोटी खर्च आहे, ते डिसेंबर अखेरपर्यंत सुरु होणार आहे. सागर माला हा मोठा प्रकल्प असून यामध्ये 12 मोठी बंदरे येतात. यामध्ये 16 लाख कोटीची गुंतवणूक आहे. या पैकी 2.80 लाख कोटीची कामे सुरु झाली आहेत.

यावेळी व्यासपीठावर साबांखामंत्री सुदिन ढवळीकर, नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, महसूलमंत्री रोहन खंवटे, खासदार नरेंद्र सावईकर, आमदार ग्लेन टिकलो, दीपक पाऊसकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, साबांखा अधिकारी व लार्सन अँड टुब्रो कंपनीचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

Related posts: