|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रस्त्यांसाठी गोवा ‘रोल मॉडेल’ म्हणून विकसित करावे

रस्त्यांसाठी गोवा ‘रोल मॉडेल’ म्हणून विकसित करावे 

अभियंता दिन कार्यक्रमात डॉ. स्वरुप यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पणजी

गोवा हे लहान राज्य असल्यामुळे ‘रोड मॉडेल’ (रस्त्यांसाठी उत्कृष्ट नमूना) म्हणून विकसित करून इतर राज्यांकरीता आदर्श ठेवता येणे शक्य आहे, असे निवेदन इंजिनियरिंग कौन्सिल ऑफ इंडियाचे सचिव डॉ. पी. एस. स्वरुप यांनी केले. गोवा राज्यासाठी काही प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) हाती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पणजीतील हॉटेल डेल्मनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अभियंता दिन आणि मेळावा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. इतर राज्ये मोठी असल्याने त्यांना रोड मॉडेल बनणे शक्य नाही, परंतु गोव्यात मात्र ते करण्याची क्षमता आहे. इंजिनियरिंग कौन्सिल ऑफ इंडियाची शाखा व कार्यालय गोव्यात सुरू करण्याचे त्यांनी जाहीर केले.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता गुरुनाथ नाईक पर्रीकर हे सन्माननिय पाहुणे या नात्याने उपस्थित होते. ते म्हणाले की, गोव्याचे 35 टक्के शहरीकरण झाले असून कचरा, सांडपाणी निचरा व इतर समस्या वाढल्या आहेत. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी आवश्यक असणाऱया अनेक प्रकारच्या साधनसुविधा वाढवणे तसेच त्यांचा दर्जा सुधारणे निकडीचे बनले आहे. राज्याच्या भौगोलिक रचनेमुळे तसेच काही डोंगराळ भागामुळे पाणी वितरण व्यवस्थित होत नाही. तसेच अनेक ठिकाणी पाणी टंचाई किंवा त्याची कमतरता भासते. त्यावर उपाययोजना करण्याचे काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

मेळाव्याचे नमंत्रिक समीर सुर्लकर यांनी सर्वांचे स्वागत केले, तर निमंत्रिक अनिल खंवटे यांनी गोव्याच्या बांधकाम क्षेत्रातील समस्या, प्रश्न ठळक गोष्टी नजरेस आणून दिल्या. शेवटी प्रश्नोत्तराच्या रुपाने गोव्यातील बांधकाम उद्योगावर चर्चा, विचारविनिमय झाले. मडकई तसेच पणजी क्षेत्रातील आणि विविध बांधकाम कंपन्यांचे इंजिनियर्स मेळाव्यास उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रातील विविध मंडळे, संस्था यांच्यातर्फे हा अभियंता दिन व मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Related posts: