|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जलवाहिनीमध्ये चक्क चप्पल आढळले

जलवाहिनीमध्ये चक्क चप्पल आढळले 

प्रतिनिधी/ बेळगाव

शास्त्रीनगर येथील काही भागात पाणीपुरवठा व्यवस्थित केला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. यासंदर्भात तरुण भारतने वृत्त देऊन नागरिकांची समस्या मांडली होती. याची दखल पाणीपुरवठा मंडळाने घेतली असून पाणीपुरवठा पुरेशा दाबाने का होत नाही, याची चाचपणी चालविली आहे. क्रॉस नंबर दोन व क्रॉस नंबर 4 येथे खोदाई करण्यात आली असून पाईपलाईनची तपासणी करण्यात येत असताना त्यात चक्क चप्पल अडकल्याचे आढळून आले. तसेच काही ठिकाणी पाईपलाईनमध्ये लहान दगड व मातीचा गाळ साचल्याचे दिसून आले. या प्रकाराने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

 शास्त्रीनगर परिसरातून जाणाऱया नाल्यांमुळे तसेच येथील जुनी ड्रेनेज पाईपलाईन ठिकठिकाणी फुटल्यामुळे विहिरी तसेच कूपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. अशा परिस्थितीत नळाला येणारे पाणी पुरेसे नसल्याने वारंवार पाणी समस्या उद्भवत आहे. पाणी कोठून आणावे असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. आता तर पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये चप्पल, माती व गाळ असल्याचे आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने या प्रकाराची दखल गांभीर्याने घेऊन नागरिकांना स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजना आखण्याची मागणी करण्यात येत आहे.