|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » वोडाफोन-आयडीया युतीला तोटय़ाचा फटका

वोडाफोन-आयडीया युतीला तोटय़ाचा फटका 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

ग्राहकांना सर्वोच्च सेवा देण्याच्या मुद्यावर विलिनीकरण साधलेल्या वोडाफोन आणि आयडीया या दूरसंचार कंपनीला पहिल्याच तिमाहीमध्ये तब्बल 4973 कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे. 31 ऑगस्ट रोजी दूरसंचार क्षेत्रातील या दिग्गज कंपन्यांनी एकत्रिकरणाची घोषणा केली होती. मात्र ही संयुक्त आघाडी ग्राहकांचे समाधान करु शकली नाही आणि स्वतःचाही फायदा साधू शकली नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे निवेदन प्रसिद्ध केले आहे. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीतील ताळेबंद विचारात घेण्यात आला आहे. मात्र याची तुलना ग्राहकांनी गेल्या वर्षीच्या दोन्ही कंपन्यांच्या ताळेबंदाशी करु नये, असेही म्हटले आहे. कारण या तीन महिन्यांमध्ये विविध कंपन्यांमध्ये दराची मोठी स्पर्धा सुरु आहे. वेगवेगळय़ा ऑफर्समुळे विलिनीकरणानंतरच्या एकत्रित रक्कमांचे आकडे तोटा दर्शवत आहेत. परंतु पुढील तिमाहीमध्ये मात्र यात निश्चितच सुधारणा दिसून येईल, असाही दावा कंपनीने केला आहे.

तथापि या तोटय़ामागील कारणांचा आढावाही घेतला जात आहे. प्रती ग्राहक महसूल घटल्याचे निदर्शनास आले असून अनेकांनी दुसऱया कंपनीचा आसरा घेतल्याचेही दिसून आले आहे. सध्या प्रति ग्राहक महसुलामध्ये 4.7 टक्के घट झाली असून हा आकडा 88 रुपयांवर आला आहे. तर देशातील सर्वात मोठय़ा दूरसंचार ऑपरेटर कंपनीची ग्राहक संख्या 42.2 कोटी असून या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल 7 हजार 667 कोटी आहे.

तरीही दोन्ही कंपन्यांनी ग्राहक सेवेमध्ये अधिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कंपनीच्या संचालकांनी संयुक्तपणे 25 हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रवर्तक भागधारकांनी 18 हजार 250 कोटीची गुंतवणूक तर व्होडाफोनकडून 11 हजार आणि आदित्य बिर्ला समुहाकडून 7 हजार 250 कोटी गुंतवणुकीचे संकेत आहेत. सक्षम सेवा देण्याचा मानस असून कंपनी पुढील तिमाहीमध्ये नफ्याकडे वाटचाल करेल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.