|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » वेगळ्या भूमिका करायला नक्कीच आवडतील : स्वप्निल जोशीचे मत

वेगळ्या भूमिका करायला नक्कीच आवडतील : स्वप्निल जोशीचे मत 

पुणे / प्रतिनिधी :

मी आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षाही वेगळ्या भूमिका निश्चितच करायला आवडतील, असे मत अभिनेता स्वप्निल जोशी याने बुधवारी येथे व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘सांस्कृतिक कट्टय़ावर’ अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते.

स्वप्निल म्हणाला, कलाकार म्हणून तुम्ही काम करत राहता. पण, एक वेगळी ओळख निर्माण झाली, की कलाकार म्हणून तुम्ही तुमचे न राहता प्रेक्षकांचे होऊन जाता. तुमची इमेज हे रसिक ठरवत असतात. आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा नक्कीच वेगळ्या भूमिका करायला आवडतील.

सध्या मराठी चित्रपटांचा चांगला हंगाम आहे. एका हिंदी चित्रपटाला सध्या दोन मराठी चित्रपट टक्कर देत आहेत, हे बघून मराठी चित्रपटाबद्दल गर्व वाटतो. कुठलेही नातेसंबंध म्हटले, की तडजोड आलीच. आयुष्यामध्ये आपण फक्त आपल्या हक्काची व्यक्ती शोधायला हवी. त्या योग्य व्यक्तीसोबत आपण गरज भासल्यास तडजोड करायला हवी, असेही त्याने नमूद केले.

मराठी रसिक प्रेक्षकांनी मराठी चित्रपट बघायला थेटरला येणे, हे खूप महत्त्वाचे आहे. हल्ली वेबसीरीजला चांगले दिवस आले आहेत. याचा चित्रपटसृष्टीला तोटा न होता फायदाच होईल. वेबसीरीज ही मोबाईलवर बघता येत असल्याने त्याचा दर्जादेखील तितकाच उत्तम आहे. त्यामुळे, चित्रपटसृष्टी तांत्रिकदृष्टय़ा खूप प्रगल्भ होणार आहे, असे मत दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी व्यक्त केले.