|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा! साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा

बॅ.नाथ पै यांचा पुनर्जन्म व्हावा! साधना प्रकाशनच्या पुस्तक पुनर्प्रकाशन समारंभातील अपेक्षा 

बेळगाव / प्रतिनिधी :

देशातील सर्व क्षेत्रांमध्ये निर्माण झालेल्या अराजकाच्या परिस्थितीमध्ये आज देशाचे प्रबोधन कोण करणार, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. अशावेळी एकाच विचारधारेने प्रेरित होऊन अवघे आयुष्य एकाच पक्षात व्यतित करण्याची किमया करणाऱया बॅ. नाथ पै सारख्या नेतृत्वाची उणिव पावलोपावली जाणवते आहे. त्यामुळे बॅ. नाथ पै पुन्हा जन्माला यावेत, अशी प्रार्थना करण्याची वेळ आली आहे, असे विचार पुणे येथील जडणघडण मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी व्यक्त केले.

लोकमान्य ग्रंथालयाच्यावतीने आयोजित इंदिरा संत स्मृती व्याख्यानमाला 2019 (पुष्प दुसरे) अंतर्गत गुरुवारी सायंकाळी ज्ये÷ संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या जीवनावरील दोन पुस्तकांचा पुनर्प्रकाशन समारंभ येथील लोकमान्य रंगमंदिरात पार पडला. या कार्यक्रमाद्वारे बॅ. नाथ पै यांच्या स्मृतीस आगळे अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पुणे येथील साधना प्रकाशनचे संपादक विनोद शिरसाट, बॅ. नाथ पै यांचे भाचे यशवंत महाजन, पुतणे शैलेंद्र पै, नाथ पैं चे सहकारी ऍड. राम आपटे, राष्ट्र सेवादलाचे दत्ता वांदे, लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. डी. पी. वागळे आदी उपस्थित होते. ‘लोकमान्य’चे समूहप्रमुख किरण ठाकुर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या मान्यवरांच्या हस्ते वासू देशपांडे लिखित ‘लोकशाहीचा कैवारी’ आणि ‘लोकशाहीची आराधना’ (बॅ. नाथ पै यांची संसदेबाहेरील भाषणे) या दोन पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. सागर देशपांडे म्हणाले, देशातील अनेक क्षेत्रांमध्ये आज चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि  साहित्यिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेली विचारधारा देशासमोर अनेक प्रश्न निर्माण करते आहे. अशावेळी नाथ पैंच्या विचारधारेची खरोखरच गरज भासते. नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानिमित्ताने नयनतारा सहगल यांच्या संदर्भात उद्भवलेला वाद हे याचेच उदाहरण आहे. 1970 साली महाबळेश्वर येथे झालेल्या साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून बॅ. नाथ पै उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात ‘समाजाच्या साहित्यिकांकडून अपेक्षा’ या विषयावर केलेले विवेचन आजच्या साहित्यिकांना समजणे गरजेचे आहे.