|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार

केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार 

प्रतिनिधी/ पणजी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सध्या देशातील सर्व विरोधी पक्ष व भ्रष्टाचारी नेते एकत्र आले आहेत. देशातील जनता मात्र मोदींच्यासोबत असल्याने देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर येईल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी पत्रकार परिषदेत केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रमुख नेते विविध राज्यामध्ये जाऊन प्रसारमाध्यमांनी बोलतात. त्याचाच एक भाग म्हणून हुसेन गोव्यात आले होते. देशभरात आज पुन्हा एकदा भाजपचाच माहोल बनला आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार असाच नारा सर्वत्र आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी लोकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. म्हणून विरोधी नेते मोदी विरोधात एकत्र आले आहेत. जे नेते कधी एकमेकांची तोंडे पाहत नव्हते ते आज एका व्यासपीठावर आले आहेत.  ममता बॅनर्जींनी सर्व दलांच्या नेत्यांना एकत्र केले आहे, मात्र हे सर्व नेते कधीच एकत्र राहणार नाहीत. विरोधकांचे महागठबंधन म्हणजे जतनेला फसविण्याचा धंदा असल्याचे ते म्हणाले.

आगामी संसदेत मोदीच पंतप्रधान

भाजप आणि मोदींच्या विरोधात महागठबंधन एकत्र आले तरी लोकांचे गठबंधन सध्या मोदींच्या पाठिशी आहे. त्यामुळे आगामी मोदीच देशाच्या पंतप्रधानपदी राहतील, असेही हुसेन यांनी सांगितले. भाजपला हटविण्याचे विरोधकांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढमध्ये जरी भाजपला अपयश आले तरी लोकसभा निवडणुकीत भाजपच जिंकणार. उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 74 जागा भाजप जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपविरोधातील आरोप खोटे

विजय मल्ल्या, निरव मोदी, चोकसी यांनी बँकांना गंडा घातला व ते देश सोडून पळाले. त्याचा आरोप आज भाजप सरकार व पंतप्रधान मोदींवर केला जातो, पण ते खोटे आहे. काँग्रेसने 60 वर्षात लाखो कोटींची कर्जे बुडविण्यास मदत केली, असा आरोपही त्यांनी केला. याचे उत्तर काँग्रेसने द्यायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीचे त्यांनी समर्थन केले. नोटबंदी केली नसती तर बँकिंग सिस्टिम नष्ट झाली असती. आज काँग्रेस वाट्टेल ते आरोप करत आहे. श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे ते म्हणाले.

युवावर्गासाठी भाजपने मोठे काम केले

देशातील युवावर्ग व गरीब जनता यांच्यासाठी मोदींनी खुप मोठे काम केले आहे. शेतकऱयांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. मोदींनी सबका साथ सबका विकास हे धोरण ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच देशात अल्पसंख्यांक सुखी आहेत. तयांच्या काळात सर्वांत कमी दंगली झाल्या. मोदी हे सर्वांनाच समान नजरेने पाहतात. काँग्रेस खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राफेल डीलचा ऑडिओ खोटा

गोव्यात केंद्रात पाठवलेला रायफल डील संदर्भातला ऑडिओ फेक होता, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे अशा ऑडिओविरोधात चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले. काँगेसने आजपर्यंत कधीच खरे बोललेले नाही. त्यामुळे भाजप काँग्रेसला गंभीरपणे घेत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

300 पेक्षा जास्त जागा मिळवणार

यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळणार असा दावा त्यांनी केला. मागील लोकसभा निवडणुकीत 272 जागा भाजपला मिळतील असा अंदाज बांधण्यात आला होता, प्रत्यक्षात मात्र 283 जागा भाजपला मिळाल्या. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढमध्ये पराभव झाला असला तरी लोकसभेत भाजपला यश मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

खाणबंदीवर उपाय काढणार

गोव्यातील खाणबंदीबाबत केंद सरकारलाही चिंता आहे. खाण अवलंबितांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. आपणही शहा यांच्याशी बोलणार आहे. गोव्यातील खाणबंदीचा विषय सोडविला जाणार असल्याचेही ते म्हणाले. आपण राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांची भेट घेतल्याचेही शहनवाज हुसेन यांनी सांगितले. 

Related posts: