|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हिंदू संस्कृती टिकविण्यात भक्तिमहोत्सवाचे योगदान

हिंदू संस्कृती टिकविण्यात भक्तिमहोत्सवाचे योगदान 

खासदार विनय तेंडुलकर यांचे गौरवोद्गार

प्रतिनिधी/ पणजी

ज्ञानदीप गोवा आणि लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मागील तीन दिवस आयोजित करण्यात आलेला भक्तिमहोत्सव हा एक सुंदर कार्यक्रम आहे. गोमंतकीय संस्कृती अन्य राज्यात कळावी यासाठी मागील वर्षी लोकमान्य मल्टिपर्पजचे संस्थापक किरण ठाकुर यांनी बेळगावात शिगमोत्सवाचे आयोजन केले होते. याचप्रकारे आपली हिंदू संस्कृती टिकून रहावी यासाठी किरण ठाकुर यांच्याच प्रेरणेने या भक्तिमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशाप्रकारचे कार्यक्रम होत राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार विनय तेंडुलकर यांनी केले.

आझाद मैदानावर आयोजित भक्तिमहोत्सवाच्या चौथ्या पुष्पाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. व्यासपीठावर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर, संचालक सई ठाकुर बिजलानी, कीर्तनकार बाळूमहाराज गिरगावकर, भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर, कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, ज्ञानदीप गोवाचे सचिव सागर जावडेकर, कोषाध्यक्ष शंकर जाधव, कार्यकारी सदस्य सुनील नाईक, लोकमान्य मल्टिपर्पजचे उत्तर गोवा प्रमुख कुमार प्रियोळकर व दक्षिण गोवा प्रमुख सुहास खांडेपारकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

भक्तीचा मार्ग हा जीवन बदलणारा मार्ग : किरण ठाकुर

भक्तिमहोत्सवाचा हा कार्यक्रम म्हणजे प्रत्यक्ष पंढरपुरात असल्याची अनुभूती देणारा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात कीर्तनकारांचाही फार मोलाचा वाटा आहे. तुकडोजी महाराजांसारख्या अनेक कीर्तनकारांनी स्फूर्ती देणारी कीर्तने सादर केली. कीर्तनकार कीर्तनातून प्रभावीपणे जीवनाचे सार मांडत असतो. भक्तीचा मार्ग जीवन बदलणारा मार्ग आहे. जीवनात भक्ती, श्रद्धा असणे गरजेचे आहे, असे मत लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक आणि तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केले.

आपल्या माणसांनी हिंदू संस्कृतीचे जतन केले आहे. त्यामुळे अजूनही गोमंतकीय तसेच इतर राज्यातील लोक दरवर्षी आषाढी, कार्तिकीला विठ्ठल भक्ती व्यक्त करण्यासाठी अनवाणी पंढरपुरला जातात. माणसाने आपल्या जीवनात रामाची, रावणाची की कुंभकर्णाची प्रवृत्ती आचरणात आणावी याबद्दल विचार करणे आवश्यक आहे, असे किरण ठाकुर यांनी पुढे सांगितले.

पणजीत आज अवतरणार पंढरपूर

गोव्यात भजन, दिंडीची परंपरा आहे. गोमंतकाला देवभूमी मानली जाते. शास्त्राsक्त पद्धतीने गोव्यात भजने म्हटली जातात. संस्कृतीचे जतन होत आहे. निसर्गरम्य गोव्यात या परंपरेने जनसमुदाय जोडलेला आहे. यामुळे रविवारी पणजीत महादिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायं. 3.45 वा फार्मसी कॉलेज येथून महादिंडीला प्रारंभ होणार आहे आणि आझाद मैदानाला सांगता होणार आहे. या स्पर्धेत 32 पथके आणि 5000च्या वर दिंडी वारकरी सहभागी होणार आहेत. मागील वर्षी 8000 कलाकार सहभागी झाले होते. यंदाही असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. आज महादिंडीतून पणजीत पंढरपूर अवतरणार असल्याची माहिती किरण ठाकुर यांनी दिली.

यावेळी किरण ठाकुर यांच्याहस्ते खासदार विनय तेंडुलकर, कीर्तनकार बाळूमहाराज गिरगावकर, भाजपा सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर, कार्यकारी सदस्य सुनील नाईक, सुहास खांडेपारकर, कुमार प्रियोळकर, रमेश साळगावकर, अर्चना कामुलकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी पानवेलकर भजनी मंडळातर्फे महाआरती सादर करण्यात आली. उद्घाटनापूर्वी आजगाव सावंतवाडी येथील आजगावकर दशावतारी नाटयमंडळातर्फे ‘कृष्ण हनुमान युद्ध’ नाटय़प्रयोग सादर करण्यात आला. सदर नाटक पणजीवासियांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या नाटय़प्रयोगाला पणजीकरांनी उदंड प्रतिसाद मिळाला.

Related posts: