|Monday, January 27, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » संपूर्ण जग भारताच्या पाठिशी, चीन-पाकची मुजोरी

संपूर्ण जग भारताच्या पाठिशी, चीन-पाकची मुजोरी 

काश्मीरमधील पुलवामानजीकच्या अवंतीपुरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया सर्व जगात उमटत आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन या महासत्तांसह नेपाळ, भूतात, मालदीव, बांगलादेश आणि श्रीलंका या देजारी मित्रदेशांना भारताला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. पाकिस्तान आणि चीनचे शेपूट मात्र वाकडे ते वाकडेच असल्याचे उघड झाले आहे. पाकमधील वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांनी दहशतवाद्यांचा उल्लेख स्वातंत्र्यसैनिक असा केला आहे, तर चीनने जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझराला दहशतवादी मानण्यास नकार दिला आहे.

या भ्याड पण क्रूर हल्ल्याने भारतात संतापाची लाट उसळली असून देशात शुक्रवारी अनेक स्थानांवर पाकिस्तान विरोधात निदर्शने करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तानो जला दो, हमलेका बदला लो, भारत माता की जप अशा घोषणा देत निदर्शकांनी पाकचा निषेध केला.

अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

अमेरिकेने या हल्ल्याचा कठोर शब्दांमध्ये निषेध केला असून पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानने त्वरीत त्याच्या भूमीवरील सर्व दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या संघटनांचा नायनाट करावा. आपल्या भूमीचा उपयोग दहशतवादी कृत्यांसाठी आणि प्रशिक्षणासाठी होऊ देऊ नये, अन्यथा परिणाम चांगला होणार नाही, असे अमेरिकेच्या विदेश व्यवहार विभागाने सुनावले आहे. भारताला आमची सहानुभूती असून पाठिंबा आहे, असा संदेश अमेरिकेने दिला.

इतर देशही व्यथित

हा हल्ला केवळ भारतावरील नसून संपूर्ण मानवतेवरील आहे. साऱया देशांनी एकत्र येऊन अशा घटनांचा सामना केला पाहिजे. आम्ही भारताच्या पाठीशी आहोत. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठीशी घालणे बंद केले पाहिजे, अशा प्रतिक्रिया फ्रान्स, ब्रिटन, रशिया व भारताच्या पाक वगळता सर्व शेजारी देशांनी व्यक्त केल्या आहेत.

सिद्धूचे शांती तुणतुणे सुरूच…

पंजाब राज्याचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मात्र या भीषण प्रसंगानंतरही त्यांचे नेहमीचे पाकिस्तान प्रेमाचे तुणतुणे सुरूच ठेवले आहे. बंदुकीच्या गोळय़ांनी हा प्रश्न सुटणार नाही. पाकशी बोलणी करणेच आवश्यक आहे. या हल्ल्यासाठी साऱया पाकिस्तानला जबाबदार धरणे योग्य नाही, अशा तऱहेची मुक्ताफळे त्याने उधळली आहेत. यामुळे समाजमाध्यमांवर टीकेची झोड उठली आहे.

राजनाथ सिंगनी दिला हुतात्मा जवानांना खांदा…

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी श्रीनगर येथे पोहचून शहीद जवानांना मानवंदना दिली. तसेच हल्ल्यामध्ये वीरमरण आलेल्या जवानांच्या पार्थिवाचा भार आपल्या खांद्यावर घेत अखेरचा निरोप दिला आहे. यावेळी जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलाबाग सिंग यांनीही वीरपुत्राला खांदा देत अखेरचा निरोप दिला. यावेळी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनीही दुःख व्यक्त करत सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. बडगाम येथील सीआरपीएफच्या तळावर पार्थिव आल्यानंतर सर्व जवानांना अश्रूच्या धारा अनावर झाल्या होत्या.

…ही वेळ राजकारण करण्याची नाही : राहुल गांधी

काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत आपले मतप्रदर्शन केले. या कसोटीच्या क्षणी काँगेस सरकारच्या पाठीशी आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. साऱया देशाने एकजुटीने दहशतवादाचा निषेध करण्याची आहे. भारत सरकार पाकविरोधात जी कारवाई करेल त्याला आमचा पाठींबा असेल, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले. दहशतवादाद्वारे देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न केले जातात. कोणतीही शक्ती या देशाचे तुकडे नाही करु शकत, असे राहुल गांधींनी सुनावले. अशाप्रसंगी काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष देश आणि सरकारच्या पाठीशी उभे आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Related posts: