|Saturday, December 7, 2019
You are here: Home » क्रिडा » दहशतवाद थांबेपर्यंत पाकिस्तानशी क्रिकेट मालिका नाही

दहशतवाद थांबेपर्यंत पाकिस्तानशी क्रिकेट मालिका नाही 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

क्रिकेट व राजकारण यांची सरमिसळ, गफलत होणार नाही, यासाठी आपले नेहमीच प्रयत्न राहिले आहेत. पण, पाकिस्तान जोवर दहशतवाद थांबवत नाही, त्याला खतपाणी घालणे बंद करत नाही, तोवर त्यांच्या संघाविरुद्ध द्विदेशीय क्रिकेट मालिका खेळण्याचा प्रश्नच येत नाही, असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला सोमवारी म्हणाले. पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान हुतात्मा झाले. त्या पार्श्वभूमीवर शुक्ला बोलत होते.

भारत-पाकिस्तान यांच्यात 2013 नंतर एकही द्विदेशीय मालिका झालेली नाही. दोन्ही देश या पाच-एक वर्षाच्या कालावधीत केवळ चॅम्पियन्स चषक, आशिया चषकासारख्या बहुदेशीय संघांचा सहभाग असलेल्या स्पर्धांमधूनच परस्परांविरुद्ध लढले आहेत. त्याचाच एक भाग असलेल्या आयसीसी विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात दि. 16 जून रोजी मँचेस्टरमध्ये आणखी एक सामना होणार आहे. मात्र, या लढतीबद्दल बोलताना शुक्ला यांनी सावध पवित्रा घेतला.

‘विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार का, याबद्दल आताच काही बोलणे घाईचे ठरेल. कारण, विश्वचषक स्पर्धेला अद्याप बराच अवधी बाकी आहे. मात्र, आमचे धोरण स्पष्ट आहे. आम्ही केंद्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करु’, असे ते याप्रसंगी म्हणाले.

सामन्यावर बहिष्काराची मागणी

दरम्यान, आयसीसी विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्ध लढतीवर भारताने बहिष्कार टाकावा, अशी मागणी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे (सीसीआय) सचिव सुरेश बाफना यांनी केली. बीसीसीआयशी संलग्न असलेल्या सीसीआयने पुलावामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, आपल्या मुंबई कार्यालयातील इम्रान खानच्या पोट्रेटला पडद्याने झाकले असून पंजाब क्रिकेट संघटनेने देखील मोहाली क्रिकेट स्टेडियममधील पाकिस्तानी क्रिकेटपटूंची सर्व छायाचित्रे, पोस्टर्स हटवली आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आयएमजी-रिलायन्सने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचे प्रक्षेपण करण्यास नकार कळवला असून डी-स्पोर्ट्स या वाहिनीनेही भारतात स्पर्धेचे प्रक्षेपण करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

Related posts: