|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्रातर्फे श्रींचा प्रगट दिन उत्साहात

श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्रातर्फे श्रींचा प्रगट दिन उत्साहात 

प्रतिनिधी / बेळगाव :

   गजानन महाराज (शेगांव) भवन परिवार केंद्रातर्फे श्रींचा प्रगट दिन सोहळा पार पडला. यानिमित्ताने सोमवारी शांतीनगर, टिळकवाडी येथील गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले. यानिमित्ताने मंदिरात सकाळी श्रींची काकड आरती झाली. त्यानंतर श्रींच्या पादुकांवर दुधाभिषेक करण्यात आला. तसेच श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18 ते 21 मधील सामुदायिक पारायण पार पडले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

 यावेळी ऋग्वेदी भागवत मठ हत्तरगीचे श्रीहरिकाका गोसावी यांचे प्रवचन झाले यावेळी त्यांनी समाजातील लोंकानी स्वाध्याय करावा, प्रत्येक नात्याचा धर्म सांभाळावा, धर्म सांभाळताना आपण अपेक्षा रहित असावे, आपणाला मोक्ष हवा असेल, स्वर्ग हवा असेल तर अपेक्षा रहित धर्म संग्रहालयात दुसरा पर्याय नाही. म्हणून अपेक्षा रहित धर्म संग्रह करून पुण्य संचय करावा, असे सांगितले.

  दुपारी मंदिरात श्रींची महाआरती व सायंकाळी शास्त्रीनगर येथील माउली भजनी मंडळाचे भजन झाले. तसेच नित्योपासना, श्रींची आरती, रात्री 8 वाजता मंडोळी येथील सांप्रदायिक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री श्रींची शेजारती झाली. प्रारंभी गजानन महराज भक्त परिवार केंद्राचे उपाध्यक्ष एल. व्ही. देसाई यांनी श्रीहरिकाका गोसावी यांचा सत्कार केला. गजानन महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसदाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. याप्रसंगी अध्यक्ष राम भंडारी, रमेश सोलापूरकर, सचिव सुनिता देशपांडे, श्रीधर मोहिते, रमेश फाटक, सुभाष पेंडसे, जयश्री रेवाळे, दिनेश पाटील, मालतेश पाटील, रविंद्र कुलकर्णी, भाउ मन्नोळकर, महेश पाटील, शाहूराज घाटगे, जितेंद्र रजपुत यासह भक्तगण मोठय़ा संख्येने उपस्थित होते.