|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुख्यमंत्र्यांकडून जाहीर 100 कोटी अखेर महापालिकेकडे

मुख्यमंत्र्यांकडून जाहीर 100 कोटी अखेर महापालिकेकडे 

प्रतिनिधी /सांगली :

 महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली महापालिकेला 100 कोटी रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पुर्तता मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरूवारी केली. हे 100 कोटी महापालिकेला प्राप्त झाले आहेत. या 100 कोटीच्या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी शुक्रवारी तातडीने स्थायी समितीची सभा होणार आहे. स्थायीच्या सभेत या कामांना मंजुरी देवून ही कामे आचारसंहितेपूर्वी सुरू करणार असल्याचे महापौर सौ. संगीता खोत व आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. या 100 कोटी शिवाय आणखी 100 कोटी रूपये देण्याचेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर 16 ऑगस्ट 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुवर्ण नगरोत्थान योजनेतून सांगली महापालिकेला 100 कोटी रूपये देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार तातडीने प्रस्ताव तयार करून देण्याचे आवाहन केले होते. सांगली महापालिकेने मुख्यमंत्र्यांकडे या 100 कोटीसाठी 146 कोटीचे प्रस्ताव काही दिवसापूर्वी सादर केले होते. या कामांना मुख्यमंत्र्यांकडून तातडीने मंजुरी मिळण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांनी प्रयत्न केले. त्यानुसार गुरूवारी या प्रस्तावाला मंजुरी मिळून सांगली महापालिकेला 100 कोटी रूपये देण्याची प्रशासकीय मंजुरी आणि आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

या 100 कोटीवर मिरजेच्या कामांचा वरचष्मा

मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या 100 कोटीच्या कामात रस्त्यांची 178 कामे, गटारी 69, दफनभूमी चार, ड्रेनेजची तीन आणि पाणीपुरवठय़ाचे एक अशी एकूण 265 कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये रस्त्यांसाठी 53 कोटी पाच लाखांचा निधी खर्च होणार आहे. तर गटारीसाठी 14 कोटी 78 लाख रूपये, दफनभूमीसाठी दोन कोटी 36 लाख, ड्रेनेजसाठी दोन कोटी 95 लाख आणि पाणीपुरवठय़ासाठी तीन कोटी पाच लाख रूपये खर्ची पडणार आहेत. तर भाजीमंडई, बालगंधर्व नाटय़गृह, वारकरी भवन, मिरजेतील छत्रपती शिवाजी स्टेडियम दुरूस्ती अशा दहा कामांसाठी 23 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या सर्व कामांवर मिरजेच्या कामांचा वरचष्मा आहे. सांगलीतील कामांची संख्या जास्त आहे. पण ती कामे गटारी आणि रस्ते दुरूस्तीची आहेत. मिरजेतील कामांत मोठमोठय़ा इमारती बांधकामांचा समावेश आहे.

Related posts: