|Sunday, March 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राजकारणातील तत्त्वांची जपणूक

राजकारणातील तत्त्वांची जपणूक 

श्रीमती इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात संसदीय कामकाजमंत्री व त्यानंतर तब्बल 7 राज्यांचे राज्यपाल म्हणून काम करणारे काँग्रेस नेते भीष्मनारायण सिंह यांनी त्यांच्या सार्वजनिक-राजकीय जीवनातील पहिली निवडणूक सुमारे 45 वर्षांपूर्वी केवळ 4000 रु. खर्चून व फक्त 3 जीपगाडय़ांच्या मदतीने यशस्वीपणे लढविली होती. स्वतःला मोठय़ा अभिमानाने गांधीवादी म्हणवून घेणारे भीष्मनारायणसिंह नमूद करायचे की, सुमारे 70 च्या दशकापर्यंत देशाच्या राष्ट्रीय राजकारणावर गांधीजींच्या विचारदर्शनाचा प्रभाव होता. त्यावेळी प्रत्येक राजकीय पक्षात पक्षनि÷ा, तत्त्वनि÷ा व साधेपणा, प्रामाणिकपणा याला सर्वाधिक महत्त्व देण्यात येऊन पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीचे तिकीट वाटपही याच आधारे केले जात असे. परिणामी प्रत्येकजण तत्त्वांची जपणूक करीत असे.

डॉ. भीष्मनारायणसिंह यांच्या पुढे त्यावेळी म. गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, डॉ. राजेंद्रप्रसाद, लोकनायक जयप्रकाश नारायण आदी आदर्श म्हणून होते. त्यांच्या आठवणीनुसार बाबूंनी केलेल्या आग्रहापोटी 1967 मध्ये त्यांनी तत्कालीन बिहारच्या पलामू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांच्या शेकडो (हजारो नव्हे) कार्यकर्त्यांनी मोठय़ा उत्स्फूर्ततेने व निरपेक्षपणे त्यांचा प्रचार केला. भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या राष्ट्रपती भवनातील राहणीमानाबद्दल बोलताना भीष्मनारायणसिंह नमूद करायचे की राजेंद्रबाबू आजीवन स्वतः कातलेल्या कापसाच्या धाग्याचे वस्त्र वापरायचे. राष्ट्रपती झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या राहणीमानात कसलाही फरक पडला नाही. सलग दोन वेळा भारताचे राष्ट्रपती राहिलेले डॉ. राजेदप्रसाद निवृत्तीनंतर पाटण्याला गेले तेव्हा त्यांच्या जवळ केवळ 2,500 रु. होते. पंजाब नॅशनल बँकेने ही रक्कम आजही महत्त्वाची ठेव म्हणून कायम राखली आहे. त्यावेळी राजकीय-सार्वजनिक जीवन पैशाच्या प्रभावापासून कशाप्रकारे मुक्त होते याचे हे एक प्रमुख उदाहरण म्हणावे लागेल. याशिवाय त्याकाळी राजकीय-सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असणाऱया कुणाहीबरोबर वावरण्यास धजावत नसे. मात्र, निवडणुकीसह राजकारणावर धनदांडग्यांचा प्रभाव जसजसा वाढू लागला तसे सारे चित्रच बदलत गेले. गुन्हेगार राजरोसपणे राजकारण करू लागले तर राजकारण्यांना गुन्हे आणि गुन्हेगारांचे सोयर-सुतक केव्हाच संपले. या साऱयाचा परिणाम आपण सद्यस्थितीत पाहतोच आहे. पैशाच्या वाढत्या प्रभावळीत उमेदवार, मतदार, मतदान केंद्र विकत घेण्याजोग्या बाबी बनल्या व ‘आम आदमी’ म्हणून मतदाराची पत आणि किंमत घसरणीला लागली ती कायमचीच.

Related posts: