|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्तगाळी मठातील प्रसिद्ध रामनवमी उत्सव उत्साहात

पर्तगाळी मठातील प्रसिद्ध रामनवमी उत्सव उत्साहात 

प्रतिनिधी/ काणकोण

दक्षिण कोकण प्रांतातील सुप्रसिद्ध उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱया काणकोण तालुक्यातील पर्तगाळी येथील रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला असून पर्तगाळी मठाधीश श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराज आणि शिष्यस्वामी श्रीमद् विद्याधीशतीर्थ तसेच हजारो भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी रामजन्म सोहळा झाला.

पर्तगाळी मठात 1656 पासून रामजन्म सोहळा होत असून या क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून हजारो भाविक उपस्थित राहत असतात. या उत्सवानिमित्त विविध प्रकारच्या साहित्याची फेरी या ठिकाणी भरविण्यात येत असते. त्या फेरीत गोव्याच्या विविध भागांतील कारागीर, खाजेकार, भांडय़ांचे व्यापारी सहभागी होत असतात.

प्रत्येकाने रामायणाचे पठण करायला हवे

रामजन्म सोहळय़ाच्या वेळी विधिवत पूजाअर्चा झाल्यानंतर शिष्यस्वामी श्रीमद् विद्याधीशतीर्थ यांचे मर्यादा पुरुषोत्तम या विषयावर आशीर्वचन झाले. कर्तव्याचे परिपालन कसे करावे हा गुण जसा प्रभू रामचंद्रांकडून घ्यायला हवा त्याचप्रमाणे सूडाची भावना मनात कधीच ठेवायची नाही हे प्रभू रामचंद्रांनी शिकविले. म्हणून प्रत्येकाने रामायणाचे पठण करायला हवे असे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली.

पर्तगाळी मठातील रामनवमी ऐतिहासिक

प्रत्येकामध्ये देवांश असून संपूर्ण राष्ट्राला शक्ती देण्याची क्षमता रामायणात आणि प्रभू रामचंद्रांमध्ये आहे. साडेपाचशे वर्षांची प्रदीर्घ अशी परंपरा असलेल्या पर्तगाळी मठातील रामनवमी ही ऐतिहासिक अशी असून सर्वांना ती लाभदायक ठरत असते, असे मत श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांनी यावेळी व्यक्त केले.

रामजन्म सोहळय़ानंतर दुपारी 2 वा. शिष्यस्वामी श्रीमद् विद्याधीशतीर्थ यांच्या हस्ते अभिषेक, त्यानंतर महाप्रसाद आणि संध्याकाळी 5 वा. रथारोहणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला गोव्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, ऍटर्नी जनरल लवंदे त्याचप्रमाणे मठ समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उभय स्वामी महाराजांनी भाविकांवर फळे, मिठाई आणि नाण्यांची उधळण केली. संध्याकाळी 7 पर्यंत हा कार्यक्रम चालला. रात्री महारथ ओढल्यानंतर हनुमान मंदिराजवळ असलेल्या नारायण भूताजवळ वस्त्रs जाळण्याचा कार्यक्रम झाला. त्याला नारायण बली असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीची ग्रहबाधा नारायण बली दिल्यास कमी होते असे मानले जाते. त्यामुळे भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात.

Related posts: