|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बस्तवाड लक्ष्मीयात्रेची भक्तीमय वातावरणात सांगता

बस्तवाड लक्ष्मीयात्रेची भक्तीमय वातावरणात सांगता 

वार्ताहर/ राजहंसगड

भंडाऱयाची उधळण, लाखो भाविकांची उपस्थिती, हर हर महादेव, लक्ष्मी माता की जय, जय माती दी च्या जयघोषात बस्तवाड (हलगा) येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रेची भक्तीमय वातावरणात बुधवारी सांगता झाली.

विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर देवीसमोर गाऱहाणे घालून साकडे घालण्यात आले. देवी गदगेवर बाहेर पडल्यानंतर मंडपातील मातंगीची पूजा होऊन अग्नी देण्यात आला. गदगेवरून उठल्यानंतर यात्रा ठिकाणी देवीचा खेळ पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी भंडाऱयाची उधळण मोठय़ा प्रमाणात करण्यात आली.

गेल्या आठ दिवसांपासून अमाप उत्साहात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तसेच खेळणी, पाळणे आदी मनोरंजनाच्या खेळांचा आनंदही लुटला. बेळगावपासून अवघ्या दहा-बारा कि. मी. बस्तवाड येथे लक्ष्मीदेवीची यात्रा असल्याने परिसरातील  भाविकांनी यात्रेसाठी एकच गर्दी केली.

सायंकाळी 5 वाजता हस्त नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर सांगता समारंभास सुरुवात झाली. जवळपास दोन तास भंडाऱयाच्या उधळणीत देवीची मिरवणूक निघाली. त्यानंतर गावच्या सीमेकडे म्हणजेच विधानसौधच्या बाजूला देवीचा धार्मिक विधी करून सांगता करण्यात आली.

यात्रोत्सवाला कोणतेही गालबोट न लागता शांततेत तसेच संयमाने सर्वांनी सहभाग दर्शवून यात्रा उत्साहात पार पाडली. बुधवारी यात्रोत्सवाची सांगता होणार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

पोलीस बंदोबस्त मोठय़ा संख्येने

रथोत्सवावेळी दोन गटात वादावादी होऊन दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता. यात्रोत्सव सांगता कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात ठेवण्यात आला होता.

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबवली

श्री लक्ष्मीदेवीची मिरवणूक राष्ट्रीय महामार्गानजीक रस्ता ओलांडताना भाविकांना अडचण येऊ नये यासाठी महामार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. यामुळे महामार्गावर गाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या.