|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेस आक्षेप

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेस आक्षेप 

पुणस्थित सिंधुदुर्गवासीयांनी दिग्दर्शकाची भेट घेऊन नोंदविला रोष

प्रतिनिधी / कणकवली:

सध्या प्रक्षेपित होणाऱया ‘रात्रीस खेळ चाले-2’ या मालिकेबद्दल पुणे येथील सिंधुदुर्गवासीयांनी आक्षेप नोंदविला आहे. यासंदर्भात पुणे, पिपरी-चिंचवड सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या पदाधिकाऱयांनी सिंधुदुर्गात आकेरी-कुडाळ येथे मालिकेचे चित्रीकरण सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन आपल्या नाराजीचे निवेदन मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांना देऊन आपला रोष व्यक्त केला. प्रत्येक कोकणी माणसाकडे संशयाने पाहिले जाईल, असे चित्रीकरण मालिकेच्या पुढील भागात करू नये. अन्यथा पुन्हा पुण्यातून येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विरोधात आंदोलन छेडले जाईल, असाही इशारा त्यांनी दिला.

पुणे पिंपरी-चिंचवड सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे आणि त्यांच्या सहकाऱयांनी ‘रात्रीस खेळ चाले-2’ मालिकेच्या दिग्दर्शकांना निवेदन दिले.  मंडळाचे संस्थापक सदस्य प्रमोद राणे, ऍड. चंद्रकांत गायकवाड, धर्मराज सावंत, राजेश कांडर, सुनील गायकवाड, यशवंत गावडे, बाळ जुवाटकर, चंद्रकांत नाईक, संतोष गावडे, गिरी महाजन, दीपक मेस्त्राr, श्रद्धा साटम आदी उपस्थित होते.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे, या मालिकेत काही आक्षेपार्ह दृश्ये दाखविल्याने कोकणवासीयांची मने दुखावली आहेत. मालिका मागील वर्षी सुरू असताना त्यात भानामती, भुताटकी, देवचार या गोष्टी दाखविल्या गेल्या. यातील मालवणी भाषा तोडकी-मोडकी बोलली जात होती. मात्र, आमची मालवणी बोली या निमित्ताने या मालिकेच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचत असल्याने आनंद झाला होता. त्यामुळे  मालिकेतील काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र, पुन्हा सुरू केलेल्या मालिकेत अण्णा नाईक या व्यक्तिरेखेची वागणूक आणि प्रत्येक वेळी देव-देवस्कीचे वेगवेगळे प्रकार दाखवून महाराष्ट्रातील माणसे कोकणी माणसाकडे संशयाने पाहत आहेत. छाया या मुलीसारखी वर्तणूक कोकणातील मुलींमध्ये दिसून येत नाही. कारण आई – वडिलांच्या संस्कारामुळे मुलीचा संसार हुंडा न घेता कोकणात सुखाचा चालतो. अण्णा नाईक यांनी त्यांचा मुलगा माधव याला लग्नाआधी त्याच्या मनातील भीती घालविण्यासाठी एका स्त्राrकडे पाठविणे हे दृश्य म्हणजे कोकणवासीयांचा अपमान आहे. गावातील उडाणटप्पू बेसहारा भूमिकेतील कलाकाराला चप्पल चाटायला लावणे, अशा खालच्या दर्जाची वागणूक दिलेली आहे. कोकणात इनामदारांचे वाडे आजही आहेत. पण कोकण गुण्यागोविंदाने नांदत आहे. कोकणात येणाऱया व्यक्तींचा आदर केला जातो. मात्र, जे कधी आले नाहीत, त्यांचा या मालिकेमुळे गैरसमज होऊ शकतो. या मालिकेतील चुकीच्या गोष्टींना वेळीच विरोध न झाल्यास संयमी कोकणवासीयांबाबत यापुढे अजूनही असे प्रकार वाढू नयेत म्हणून हा विरोध आहे. दाखविलेल्या चुकीच्या गोष्टींबाबत निर्मात्याने खुलासा करावा तसेच यापुढे असे आक्षेपार्ह विषय टाळून कोकणची बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा याविरोधात जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

 कलाकारांना विरोध नाही!

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील कलाकारांबाबत आमचा कोणताही आक्षेप, विरोध नसून मालिकेमध्ये निर्मात्याने दाखविलेल्या काही चुकीच्या गोष्टी, घटना यांना आमचा विरोध आहे, असे पुणे पिपरी-चिंचवड सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या पदाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.