|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मोप विमानतळाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मोप विमानतळाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा 

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी मोप विमानतळ विकास प्राधिकरणाच्या बैठकीत विमानतळ बांधकाम आणि विकास या बाबींचा आढावा घेतला. पेडणे राष्ट्रीय महामार्गानजिक भव्य स्वरुपात अग्निशामक दलाची व्यवस्था करण्यासाठी नूतन इमारत प्रकल्प उभारण्यावर बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मोप विमानतळ प्रकल्पासंदर्भात सध्या बांधकाम बंद आहे. सर्वोच्च न्यायालयात जुलैच्या 1 तारखेला सुनावणी होणार असून त्या अनुषंगाने प्राधिकरणाने कोणती तयारी केली आहे, याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली.

अग्निशमन व्यवस्थेबाबत घेतला निर्णय

विमानतळ प्रकल्प उभारणाऱया जी. एमआर या कंपनीने अग्निशमन यंत्रणेबाबत गोवा सरकारकडे परवानगी मागितली असता या बैठकीत ती देण्यात आली. विमानतळ प्रकल्पामध्येही यंत्रणा बसविली जाईल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी पेडणे तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प होईल. त्यानंतर आसपासच्या परिसरात अनेक प्रकल्पही येतील या अनुषंगाने पेडणे तालुक्यात मोठय़ा पद्धतीने अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

सध्या पेडणेमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे, परंतु त्यासाठी जागा अपुरी आहे. अग्निशमन केंद्र राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच असावे असा प्रस्ताव मांडला आणि त्यास मान्यता देण्यात आली. यासाठी लवकरच काम हाती घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले व संबंधित अधिकाऱयांना तशा सूचना केल्या. बैठकीत आतापर्यंत विमानतळ प्रकल्पासाठी झालेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच मान्सूनपूर्व कामे हाती घेतली काय याचाही आढावा घेतला. बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच विमानतळ प्राधिकरणाचे सदस्य सचिव सुरेश शानभोगे हेही उपस्थित होते.