|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सौदी युवराज विरोधात पुरावे!

सौदी युवराज विरोधात पुरावे! 

न्यूयॉर्क :

 सौदी पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येची आंतरराष्ट्रीय चौकशी सुरू व्हावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या तज्ञाने केली आहे. सौदी अरेबियाच्या युवराजाला खशोगी यांच्या हत्येशी जोडणारे काही विश्वासार्ह पुरावे हाती लागल्याचेही तज्ञाने म्हटले आहे.

तत्पूर्वी पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्या प्रकरणात कथितरित्या राजघराण्याच्या दोन सल्लगारांची नावे समोर आली होती, पण सौदी अरेबियात सुरू असलेल्या याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एक सल्लागार अनुपस्थित राहिल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. सौदीच्या गुप्तचर विभागाचे उपप्रमुख अहमद अल-असीरी यांच्या नेतृत्वाखाली ही हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. राजघराण्याच्या न्यायालयाचे प्रसारमाध्यम विषयक सल्लागार सौद अल-कातनी यांनी त्यांना मदत केली होती.

हे दोघेही युवराज मुहम्मद बिन सलमान यांचे जवळचे सहकारी मानले जातात. खशोगी यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यावर दोघांनाही बडतर्फ करण्यात आले होते. पण खटला केवळ असीरी यांच्यावरच सुरू आहे. जानेवारीपासून न्यायालयाच्या 5 सुनावणींमध्ये ते उपस्थित राहिले होते. तर दुसरीकडे कातनी एकदाही उपस्थित राहिलेले नाहीत. सौदी सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे काही जणांचे मानणे आहे.

वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार आणि सौदी युवराजाचे टीकाकार असलेल्या खशोगी यांच्या हत्येप्रकरणी नोव्हेंबर महिन्यात 11 अज्ञात संशयितांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यात इस्तंबूल येथील सौदीच्या दूतावासात खशोगीची हत्या करण्यात आली होती. सौदी युवराजाच्या आदेशावर ही हत्या घडवून आणली गेल्याचा आरोप सीआयएने केला होता.