|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीसह कृष्णाकाठाला आत्ता नवी पूररेषा!

सांगलीसह कृष्णाकाठाला आत्ता नवी पूररेषा! 

अनधिकृत बांधकामे आणि अनियमितता याची उच्चस्तरीय चौकशी होणार

सुभाष वाघमोडे/ सांगली

महाप्रलयी विक्रमी महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगलीसह कृष्णा नदीची नव्याने पूररेषा निर्धारित करण्यात येणार असून पूरपट्टय़ात अनधिकृतपणे केलेली बांधकामे आणि मुजवलेले नाले याची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. शासनाने त्याचा अहवाल मागविला असून अधिकारी आणि राजकारणी यांच्या पोटात गोळा आला आहे. महापूर येण्याची जी विविध कारणे आहेत त्यामध्ये अनधिकृत बांधकामे व अनियमितता अधोरेखित झालेली आहे.

महापुराने सांगली शहरातील लाखो नागरिकांना विस्थापित केले. जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनालाही हादरून सोडले. पुराने इतका हाहाकार उडणार याचा कोणालाच अंदाज आला नाही. कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाले. पूररेषेने तर विक्रमच केला. या घटनेतून जिल्हा प्रशासनाने नवीन धडा घेतला असून यामुळे पुन्हा अशी आपत्ती येवून मोठी हानी होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सांगलीसाठी आत्ता नवी पूररेषा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करताना सर्व नव्या निकषानुसार पूररेषेची आखणी केली जाणार आहे. याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

सांगली शहराने 2005 आणि 2006चा महापूर पचविला. सलग दोन वर्षे आलेल्या महापुराने शहर वासियांची इतकी मोठी धावाधाव झाली नव्हती जेवढी सध्याच्या महापूराने झाली. 2005चा पूर तर एक-दोन दिवसात ओसरला होता. यावेळी 51 फुटाच्या आतच पाणी पातळी राहिली. त्यापेक्षा सहा सालचा पुराचा फटका शहरातील नागरिकांना बसला. त्यावेळी आयर्विनची पातळी 53.8 फूट झाली होती. कमी-अधिक प्रमाणात नागरिकांची धावपळ झाली. नुकसानही झाले. सध्याच्या म्हणजेच 2019 च्या महापूराने मात्र सर्वांचीच पळताभूई थोडी करून सोडली. मागील महापुराचा उच्चांक मोडीत काढत आयर्विनची पातळी 55 फुटावर गेली. नुसतीच गेली नाहीतर पूररेषेची मोजपट्टी बुडून गेली. पुलाच्या तळाला पाणी पोहोचले. निम्म्याहून अधिक सांगली पाण्यात बुडाली.

आयुक्त, जिल्हाधिकारी यांचेही बंगले पाण्यात तरंगू लागले. मारूती चौकातील पहिले मजले पाण्यात गेले. आंबेडकर रोड, शंभर फुटी, कॉलेज कॉर्नर, स्टेशन रोडवर मोठय़ा प्रमाणात पाणी आले. या महापुराने सांगली-कोल्हापूर आणि सांगली-इस्लामपूर रोडवर सहा ते सात फूट पाणी आले. कधी न बंद झालेला तासगाव रोड बंद झाला. सांगलीची कोंडी झाली. नागरिक आणि व्यापाऱयांचे कोटय़वधीचे नुकसान झाले. हजारेंचे स्थलांतर करावे लागले. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या हजारो नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागली.

या महाप्रलयी महापुराने जिल्हा प्रशासनाला नवा धडाच दिला आहे. यापुढे महापुराने अशाप्रकारे जीवित आणि वित्तहानी होवू नये यासाठी सांगलीची नवी पूररेषा आखण्याचा निर्णय प्रशानाने घेतला आहे. यानुसार सध्याच्या पुरात आयर्विनच्या कोणत्या पातळीला किती आणि कोणत्या भागात पाणी आले होते. त्या भागात नव्याने मार्किंग करून तो पट्टा डेंजर झोनमध्ये घेतला जाणार आहे. त्या भागात नव्याने बांधकामाला परवानगी देण्यात येणार नाही. याच्या कडक अमंलबजावणीसाठी मनपाला सक्ती केली जाणार आहे. यासाठी नवीन निकषही केले जाणार आहेत. या नवीन पूररेषेमुळे महापुरामुळे भविष्यात येणाऱया नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे.

पूरपट्टय़ातील घरांचे काय?

2005 आणि 2006 च्या महापुरानंतर मनपा प्रशासनाने पूरपट्टा तयार करून या पट्टय़ात बांधकामाला परवानगी न देण्याचा तसेच या भागात झालेली अनधिकृत बांधकामे पाडण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र, यानंतर पूरपट्टय़ात मोठय़ा संख्येने बांधकामे झाली. आजही बांधकामे सुरू आहेत. नैसर्गिक नाले मुजवून बांधकामाचा धडाका सुरू आहे.

अधिकाऱयांच्या संगनताने हा कारभार सुरूच आहे. मनपा आयुक्तांचा बंगलाही पूरपट्टय़ातच असल्याचे सांगण्यात येते. या बांधकामामुळेच महापुराचा धोका वाढून मोठे नुकसान झाले. त्यामुळे या पट्टय़ात झालेली बांधकामे पाडण्याचे धाडस प्रशासन करणार का? असा सवाल सांगलीकर करीत आहेत.

Related posts: