|Saturday, September 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » उपवडेत गवारेडय़ाचा वृद्ध शेतकऱयावर हल्ला

उपवडेत गवारेडय़ाचा वृद्ध शेतकऱयावर हल्ला 

वार्ताहर / दुकानवाड:

उपवडे देऊळवाडी येथील सुभाष यशवंत शेडगे (60) या शेतकऱयावर रविवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास घरापासून जवळच असलेल्या केरळीयनांच्या रबर प्लॅन्टेशननजीक गवारेडय़ाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेडगे यांना ग्रामस्थांनी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून सावंतवाडी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे रविवारी रात्रीच हलविले. या प्रकाराने उपवडे भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

माणगाव खोऱयातील उपवडे-देऊळवाडी येथे सुभाष सावंत या शेतकऱयाचे घर  जंगलमय भागात आहे. त्यामुळे परिसरात जंगली प्राण्यांचा वावर नित्याचाच असतो. रविवारी सायंकाळी सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करून शेडगे कुटुंबातील मंडळी घरी आली. दरम्यान, घरानजीक कुत्रे भुंकू लागल्याने शेडगे लगत असलेल्या भातशेती व रबर प्लॅन्टेशनच्या दिशेने गेले. यावेळी अचानक आलेल्या गव्यारेडय़ाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेडगे गंभीर जखमी झाले. आरडाओरड करत त्या गंभीर स्थितीत त्यांनी कसेबसे घर गाठले. रक्ताने माखलेल्या शेडगे यांना स्थानिक ग्रामस्थांनी धावपळ करत रविवारी रात्रीच माणगाव आरोग्य पेंद्रात व्हॅनने हलविले. तेथून सावंतवाडी रुग्णालयात हलवून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गोवा-बांबोळी येथील वैद्यकीय अधिकाऱयांनी तात्काळ उपचार सुरू केले. शेडगे यांच्या डाव्या बाजूकडील छातीच्या बरगडय़ा मोडल्या असून हातालाही गंभीर दुखापत झाली. मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच उपवडे वनपाल हरी लाड, पोलीस पाटील जिजानंद शेडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. 

कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी संपर्क साधला असून मंगळवारी घटनास्थळी पंचनाम्याकरिता वनविभागाचे कर्मचारी जाणार असून गोवा-बांबोळी येथे भेट देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.