|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचा कार्यादेश जारी

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचा कार्यादेश जारी 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूरकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी समांतर जलवाहिनीच्या कामाचा कार्यादेश सोमवारी 9 सप्टेंबर रोजी हैद्राबादच्या कंपनीला दिला असून, तसा करार झाल्याची माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    सोलापूर महापालिकेच्या महापौर कक्षात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित पत्रकार परिषदेत महापौर बनशेट्टी यांनी माहिती दिली, यावेळी आयुक्त डॉ. दीपक तावरे आणि सभागृहनेते श्रीनिवास करली यांची उपस्थिती होती.

   महापौर बनशेट्टी म्हणाल्या, सोलापूरकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दुहेरी जलवाहिनीसाठी महापालिका प्रयत्नशील आहे. यातून स्मार्ट सीटी योजनेंतर्गत उजनी धरण ते सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 110 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यासाठी आलेल्या निविदांमधून दुहेरी जलवाहिनीचा मक्ता हैद्राबाद येथील पोचमपाड कंन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला आहे. जलवाहिनी टाकतेवेळी होणाऱया पीक नुकसानीच्या भरपाईसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील पाच कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.

    उजनी धरणावरून जलवाहिनीद्वारे थेट पाणी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी एनटीपीसीने 250 कोटी रुपये तर स्मार्ट सिटी योजनेतून 200 कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी 460 कोटी 63 लाख रूपये निव्वळ आणि 474 कोटी 75 लाख रूपये ढोबळ आराखडय़ास मंजुरी दिली होती. या कामासाठी पोचमपाड कन्स्ट्रक्शन हैदराबाद ने 464 कोटी 98 लाख रूपये, एनसीसी लिमिटेड हैदराबाद ने 472 कोटी 23 लाख रूपये आणि कोया ऍन्ड कंपनी हैदराबाद ने 482 कोटी 72 लाख रूपये अशा प्रकारे तीन निविदा आल्या होत्या. त्यापैकी सर्वात कमी दराची वाटाघाटीनंतर 464 कोटी रुपयांची निविदा पोचमपाड कंपनीची होती. ती मंजूर करण्यात आली.

30 महिन्यात काम पूर्ण होणार

-उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाचा आराखडा आखण्यास सुरवात झाली आहे. या 110 किलोमीटर अंतराच्या जलवाहिनीचे काम 30 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

Related posts: