|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिगावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

शिगावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून 

वार्ताहर/ आष्टा

वाळवा तालुक्यातील शिगाव येथे पूर्ववैमनस्यातून तसेच एकमेकांकडे बघण्याचा कारणावरून चाकू आणि तलवारीने वार करून तसेच छातीवर दगड मारुन दोघा भावांनी तरुणाचा खून केला. यावेळी मयताचा मित्रही घटनेत जखमी झाला. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घटना घडली. याप्रकरणी आष्टा पोलिसांनी दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामांवर गुन्हा नोंद केला आहे.

अनिकेत उर्फ बबलू शिवाजी फार्णे (वय 25) राहणार शिगाव असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मित्र सौरभ संभाजी चव्हाण (वय 18) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी आष्टा पोलिसांनी संशयित आरोपी शैलेश घाडगे, निलेश घाडगे, विश्र्वास लौंढे सर्व राहणार शिगाव यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत आष्टा पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत अनिकेत फार्णे आणि शैलेश घाडगे यांच्यात एक वर्षांपूर्वी गावातील हनुमान यात्रेत भांडण झाले होते. त्यावेळेपासून दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. शैलेश हा अनिकेतकडे रागाने पहात असे. सोमवारी रात्री पावणे आठच्या सुमारास अनिकेत व फिर्यादी सौरभ हे दोघे शिगाव येथील तरुण भारत चौकामध्ये थांबले होते. यावेळी उमेश सहदेव चव्हाण हा चौकात आला. त्याने शैलेश आणि निलेश हे दोघेजण अनिकेतला मारणार आहेत, असे सांगितले. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी अनिकेत आणि सौरभ हे शैलेश घाडगे यांच्या घरी गेले. यावेळी अनिकेत, शैलेश व निलेश यांच्यामध्ये वाद झाला. वाद सुरू असतानाच शैलेश व निलेश हे घरात आत गेले. शैलेश हातात चाकू घेऊन तर निलेश तलवार हातात घेऊन बाहेर आला.

यावेळी निलेशने शिवीगाळ करीत अनिकेतच्या तोंडावर तलवारीने वार केला. तर शैलेश याने अनिकेतच्या छातीवर आणि हातांवर चाकूने वार केला. यावेळी अनिकेत विरोध करीत असताना शैलेशचे मामा विश्र्वास लौंढे याने अनिकेतला धरुन ठेवले. दरम्यान अनिकेतला वाचविण्यासाठी सौरभ चव्हाण हा गेला असता शैलेशने सौरभच्या पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. अनिकेत गंभीर जखमी होऊन खाली पडल्यावर निलेश घाडगेने चिऱयाचा दगड उचलून अनिकेतच्या छातीवर मारला. दगडाच्या हल्ल्याने अनिकेत जाग्यावरच निपचित पडला.

त्यानंतर सौरभने निपचित पडलेल्या अनिकेतला उपचारासाठी आष्टा ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथील वैद्यकीय अधिकाऱयांच्या सल्ल्याने सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठविले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अनिकेत मयत झाला असल्याचे सांगितले. याप्रकरणी सौरभ चव्हाण याने आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी शैलेश घाडगे, निलेश घाडगे, विश्र्वास लौंढे यांना ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक दिलीप ढेरे अधिक तपास करीत आहेत.

Related posts: