|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा उपजिल्हा इस्पितळाला ‘राष्ट्रीय कायाकल्प’ पुरस्कार

फोंडा उपजिल्हा इस्पितळाला ‘राष्ट्रीय कायाकल्प’ पुरस्कार 

प्रतिनिधी/ फोंडा

भारत सरकारच्या केंद्रिय आरोग्य खात्यातर्फे देण्यात येणारा ‘राष्ट्रीय कायाकल्प’ पुरस्कार फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळाला प्राप्त झाला आहे. स्वच्छता, आरोग्य आणि रोग संसर्ग नियंत्रण या विभागात उत्कृष्ट कामगिरीसाठी गोवा राज्यात प्रथमच फोंडा उपजिल्हा इस्पितळाला हा पुरस्कार मिळाला आहे. 

शुक्रवार 11 ऑक्टो. रोजी नवी दिल्ली येथील इंडियन हॅबिटेट सेंटरमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे व इतर मान्यवर उपस्थित होते. आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, आरोग्य कल्याण कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना धुमे यांच्या उपस्थितीत फोंडा उपजिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विकास कुवेलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रु. 15 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. फोंडा उपजिल्हा इस्पितळातील स्वच्छता, वैद्यकीय सेवा, साधन सुविधा, रोगसंसर्ग नियंत्रण अशा विविध निकषांची पडताळणी केल्यानंतर देशभरातील विविध राज्यातून सर्वोत्कृष्ट सेवेबाबत उपजिल्हा इस्पितळाला हा पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती डॉ. कुवेलकर यांनी दिली. इस्पितळातील डॉक्टर्स, कर्मचारी, स्वच्छता कामगार, या सर्वांचे त्यात योगदान असल्याचे डॉ. कुवेलकर यांनी सांगितले. त्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन तेवढेच महत्त्वाचे आहे. पुरस्काराची रक्कम इस्पितळातील साधनसुविधांवर वापरण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. गोवा राज्याला प्रथमच अशा प्रकारचा पुरस्कार प्राप्त होत असल्याचे सांगून रुग्णांना अधिकाधिक चांगली सेवा व सुविधा पुरविण्याचा उपजिल्हा इस्पितळाचा प्रयत्न असेल असे डॉ. कुवेलकर यांनी नमूद केले.

फोंडा उपजिल्हा इस्पितळाच्या कार्यक्षेत्रात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु असून एखादा रुग्ण सापडल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार करतानाच आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. फेंडा शहर व आसपासच्या भागातील खासगी डॉक्टरांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमही राबविल्याचे त्यांनी सांगितले. किडनीबाधित रुग्णांसाठी डायलेसिस संबंधी इंजक्शन्स उपजिल्हा इस्पितळातर्फे मोफत उपलब्ध करून दिले जात आहे.