|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादईप्रश्नी मुख्यमंत्री अपयशी

म्हादईप्रश्नी मुख्यमंत्री अपयशी 

गोवा फॉरवर्डचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

प्रतिनिधी/ पणजी

म्हादईप्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांनी आता त्वरित राजीनामा देण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात गोवा फॉरवर्ड पक्ष आता राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार असून कळसा-भांडुरा प्रकल्पास मिळालेल्या पर्यावरण दाखल्यास स्थगिती देण्याची याचिका दाखल करणार असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली आहे.

सावंत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी याप्रकरणी आपापली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी करून याप्रश्नी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी करणाऱया आमदार दिगंबर कामत यांच्या सूचनेस पाठिंबा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी म्हादईसाठी राजीनामा द्यावा

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरदेसाई म्हणाले की, म्हादईचा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना अचानकपणे केंद सरकारने कर्नाटक राज्याला कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी पर्यावरण दाखला देण्याची कृती धक्कादायक आहे. याप्रकरणी काही माहिती नाही, असे अज्ञान मुख्यमंत्री डॉ. सावंत दाखवतात हे देखील आश्चर्यकारक आहे. म्हादई मातेसमान आहे, असे ते म्हणत आािण तिच्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी ते दर्शवितात. मग त्यांनी सरळ राजीनामाच द्यावा अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

सहा माहिने सावंत सरकार काय करत होते

आता मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच उरलेले आणि राहिलेले नाही. डॉ. सावंत यांनी आरएसएसच्या शाखेत जाणे सुरू करावे, असा टोमणा सरदेसाई यांनी मारला. मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि त्यांचे सरकार हे म्हादई प्रश्नावर झोपलेले होते आणि आहे अशी टीकाही सरदेसाई यांनी केली. 20 एप्रिल 2019 रोजी कर्नाटक सरकारने केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयास पत्र पाठवून कळसा-भांडुरा प्रकल्पास पर्यावरण दाखला देण्याची मागणी केली होती. त्याला आता 6 महिने झाले. एवढा कालावधी सावंत सरकार काय करीत होते? अस प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केला. सरकारने म्हादई प्रश्नावर साफ दुर्लक्ष केले. तसेच गुप्तचर यंत्रणाही अपयशी ठरली, अशी मल्लीनाथी सरदेसाई यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी प्रल्हाद जोशींशी कसली चर्चा केली

कर्नाटकचे सरकार आणि केंद्रीयमंत्री प्रल्हाद जाशी हे मागील महिन्यात 9 सप्टेंबर रोजी गोव्यात आले होते आणि त्यांनी डॉ. सावंत यांच्यासमवेत चर्चा केली होती. ती कसली होती हे आता डॉ. सावंत यांनी सांगावे. डॉ. सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीवाऱया करीत आहेत. तेथे हा म्हादईचा प्रश्न ते काढत नाही की काय? अशी विचारण सरदेसाई यांनी केली. मग ते दिल्लीच्या फेऱया कशाला मारतात? गोव्याच्या हिताच्या गोष्टी जर दिल्लीत होत नसतील तर ते दिल्लीत कशाला जातात? हा प्रश्न पडतो, अशा शब्दात सरदेसाई यांनी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला.

डॉ. सावंत आणि गोव्याला केंद्रात कोण किंमत देत नाही व ती मिळत नाही हे सत्य आता या निमित्ताने समोर आले आहे. केंद्राला गोव्याचीही चिंता नाही हे देखील स्पष्ट झाल्याचे सरदेसाई म्हणाले. 

म्हादईप्रश्नी जनआंदोलनाची गरज

माजी ऍड. जनरल दत्ता लवंदे यांना हरित लवादासमोर गोव्याची बाजू मांडण्यासाठी म्हादई प्रश्नी गोवा फॉरवर्डतर्फे नेमण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या दबावामुळे वन-पर्यावरण मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे हा राजकीय निर्णय असून तो गोव्याच्या हिताचा नाही. असेच निर्णय तर होत राहीले तर मग गोवा शिल्लक राहणार कुठे? तो विकून खातील? असा इशारा सरदेसाई यांनी दिला. हा निर्णय म्हणजे सर्व अटी यांचे उल्लंघन असल्याचे मत त्यांनी प्रकट केले. जनतेने आता जागे होण्याची  व या प्रश्नी आंदोलन उभे करण्याची गरज त्यांनी वर्तवली.

……………………………………………………………………………………………………………….

Related posts: