रत्नागिरीच्या 50 वारकऱ्यांना विषबाधा

पंढरपूर / प्रतिनिधी
कर्तिकी यात्रेनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे आलेल्या 50 भाविकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व भाविकांवर शनिवारी पहाटेपासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कर्जा कुंभारवाडी येथील सुमारे 60 ते 70 लोकांची एक दिंडी पंढरपूरच्या वारी साठी आली. सदरची सर्व लोक हे येथील धुंडामहाराज मठ्ठा शेजारी इनामदार वाड्यात वास्तव्यास होते. यावेळी त्यांनी उपवासाची खिचडी आणि भगर देखील स्वतः करून खाल्ली होती. यातूनच त्यांना विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे उपवासाचे पदार्थ करण्यासाठीचे सर्व आवश्यक पदार्थ देखील या भाविकांनी त्यांच्या गावाकडूनच आणले असल्याची देखील माहिती सध्या पुढे येत आहे.
एकादशी दिवशी उपवासाचे पदार्थ आणि त्यानंतर खिचडी भाविकांनी खाल्ली. त्यानंतर शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या भाविकांना उलत्या आणि जुलाब याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तात्काळ या सर्व भाविकांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर प्रशासनाकडून उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाच्यावतीने या भविकजवळील अन्नाचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेतील रुग्णाची नुकतीच प्रांताधिकारी सचिन ढोले , मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , उपमुख्याअधिकारी सुनील वाळुजकर यांनी पाहणी केली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.