|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » शेतकऱयांच्या मदतीसाठी सर्वपक्षीय नेते आग्रही

शेतकऱयांच्या मदतीसाठी सर्वपक्षीय नेते आग्रही 

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट

विजय वडेट्टीवार यांचे राज्यपालांना पत्र

काँग्रेसचे शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला

मुंबई / प्रतिनिधी

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना लवकर मदत मिळावी, असा आग्रह सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे धरला आहे. मात्र, जोपर्यंत नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकऱयांना मदत मिळणे अवघड असल्याचे वित्त खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शेतकऱयांच्या प्रश्नावर राज्यपालांची भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी तत्काळ निधी वितरीत करावा, अशी मागणी फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली. यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालांना पत्र पाठवून शेतकऱयांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले खरीपाचे पीक हातातून गेल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलावीत, असे वडेट्टीवार यांनी राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या (शनिवार) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे दिली. राज्यपालांच्या भेटीत फक्त शेतकऱयांच्या प्रश्नावर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी त्यांना तातडीने मदत देणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यपालांनी भेटीची वेळ दिली तरच भेट होणार अससल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत 2400 कोटी रुपये खर्च

दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत द्यायच्या मदतीसाठी सन 2019-20 च्या अर्थसंकल्पात 6 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी निम्मी म्हणजे 3 हजार 200 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱयांना वितरीत केला आहे. या निधीतील आतापर्यंत 2 हजार 400 कोटी रुपये खर्च झाले आहेत. वितरीत केलेल्या निधीपैकी 800 कोटी रुपये अखर्चित आहेत. शेतकऱयांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच सरकारकडून शेतकऱयांना मदतीचे वाटप होईल, असे वित्त विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Related posts: