राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे प्रदेश उपाध्यक्ष

वार्ताहर/ एकंबे
राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुलूख मैदान तोफ म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना निवडीचे पत्र प्रदान केले.
पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात शुक्रवारी जयंत पाटील यांनी शिंदे यांना निवडीचे पत्र प्रदान केले. संपूर्ण राज्यात असलेला संपर्क, संघटन कौशल्य आणि कामगार क्षेत्रातील वाटचाल पाहून खा. शरद पवार यांनी आपल्यावर जबाबदारी सोपविली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाबरोबर संपूर्ण राज्यातील औद्योगिक व कामगार सेलची जबाबदारी आणि आगामी काळात होणार्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहर जिह्याचे प्रभारी म्हणून शशिकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आपण खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून, एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्ष जी जबाबदारी देईल, ती सक्षमपणे पार पाडणार आहे. पक्ष संघटना बळकट करण्याबरोबर औद्योगिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवून कामगार वर्गाला न्याय देणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.