|Friday, December 6, 2019
You are here: Home » Agriculture » लाव पक्षी पालन व्यवसाय नफ्याचा

लाव पक्षी पालन व्यवसाय नफ्याचा 

कमी जागेत होते नियोजन : प्रजनन आणि वाढीचा कालावधी कमी : कमी गुंवणुकीतून फायदा शक्य

चिकोडी तालुक्यातील अनेक शेतकरी आपल्या व्यवसायासोबत कोंबडी पालन, शेळीपालन आणि पशूसंगापनाचे व्यवसाय करतात. त्यातून अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. अशाप्रकारे लाव या जातीच्या पक्ष्याच्या पालनाचा व्यवसाय फायद्याचा ठरु शकतो. कमी जागेत आणि कमी गुंतवणुकीतून फायदा देणारा सदर व्यवसाय आहे. कुकुटपालनासारख्या व्यवसायात जातीच्या व्यवस्थापनानुसार मांस आणि अंडी मिळण्याचा कालावधी कमी अधिक होऊ शकतो. पण लाव पक्षी पालनातून अगदी पाच आठवडय़ात मांस आणि अंडी मिळू शकते. त्यामुळे हा व्यवसाय फायद्याचा ठरतो.

योग्य व्यवस्थापन केल्यास दर्जेदार वाढ झाल्यास प्रति पक्षी वर्षाला किमान 280 ते 300 अंडी देऊ शकतो. जलद लैंगिक परिपक्वता होत असल्याने वयाच्या सहाव्या आठवडय़ापासूनच मादी अंडी देण्यास सुरुवात करते. लाव जातीच्या पक्षाचे मांस हे कमी चरबीचे असते. त्यामुळे अधिक वजन झालेल्यांना या पक्षाचे मांस सेवनासाठी फायद्याचे ठरते. सदर पक्षाच्या मांसाने मुलांचे शरीर आणि मेंदूचा विकास चांगला होतो. याशिवाय गरोदर व स्तनपान देणाऱया स्त्राrयांसाठी पक्षाचे मांस पोषक आहार ठरते.

सहा पक्ष्यांसाठी एक चौरस फूट जागा लागते. दोन आठवडय़ानंतर पक्षी पिंजऱयात राहू शकतात. फिरुन वाया जाणारी शक्ती वाचत असल्याने त्यांचे चांगले वजन वाढण्यास मदत होते. 6 फूट लांब आणि 1 फूट रुंद पिंजरा युनिटच्या रचनेनुसार पक्षी पालन होऊ शकते. त्यात पिंजरे एकमेकांवर ठेऊन जागा वाचविली जाऊ शकते. पिंजऱयांच्या मागील बाजूला पाण्याची सोय केल्यास पक्ष्यांच्या वाढीला चांगली गती येते. 3 मादीच्या मध्ये एक नर या प्रमाणे नियोजन केल्यास प्रजनन नियोजन योग्य पद्धतीने होते.

100-150 पक्ष्यांच्या आहाराचे व्यवस्थापन करताना 0-3 आठवडय़ासाठी ज्वारी 27, सोरगम 15, तेलरहित तांदळाचा भुसा 8, शेंगदाण्याची पेंड 17, सूर्यफुलाची पेंड 12.5 सोया आहार 8, मत्स्य आहार 10, खनिजांचे मिश्रण 2.5 किलो प्रमाणे द्यावी लागते. 4-6 आठवडय़ासाठी ज्वारी 31, सोरगम 14, तेलरहित तांदळाचा भुसा 8, शेंगदाण्याची पेंड 17, सूर्यफुलाची पेंड 12.5, मत्स्य आहार 10, शंखाचा भुगा 5 किलो प्रमाणे द्यावी लागतो. सदर खाद्य हे बारीक कणीमध्ये असावे. एक ते पाच आठवडय़ापर्यंत पक्षी जवळपास 500 ग्रॅम आहार खातात.

सहा आठवडय़ानंतर मादी पक्ष्याचे वजन से 175-200 ग्रॅमपर्यंत होते. तर नराचे वजन 125-150 ग्रॅम होते. अंडय़ाचे वजन 9 ते 10 ग्रॅम असते. नर लाव हा छातीने रुंद असतो. तर भुऱया आणि पांढऱया रंगाच्या पिसांनी अच्छादीत असतो. चार आठवडे झाल्यानंतर नर आणि मादी यांना वेगवेगळे ठेवावे. अंडी उत्पादन सुरु झाल्यानंतर पक्ष्यांना दिवसातून 16 तास प्रकाश मिळायला हवा.

लावा पक्ष्यांना होणारे रोग

पक्ष्यांना जीवनसत्वे कमी पडल्यास प्रजनन कालावधीत निर्माण होणारी अंडी आणि त्यातून बाहेर पडणारी पिल्ले ही अशक्त होतात. याशिवाय कमकुवत पायांची होतात. ब्रॉयलर आणि जवारी चिकनच्या तुलनेत या पक्ष्याचे मटन हे अधिक रोगप्रतिकारक असते. त्यामुळे लसीकरण करण्याची गरज भासत नाही. पालनाचे नियोजन करताना जागेला निर्जंतुक करण्याची गरज भासते. पिलांना पिण्यासाठी पाणी आणि उच्च गुणवत्तेचा आहार दिल्यास रोगांपासून बचाव होतो.

संवर्धनातील अडचणी

नर लाव पक्षी हे मानवाला त्रास होईल असा आवाज काढतात. नर व मादी लहान पिलांना एकत्र वाढवितात. नर पक्षी अन्य लाव नरांचे डोळे फोडून त्यांना अंधळे करतात. क्वचीत वेळी काही नर अचानक मरु शकतात.

प्रा. उत्तम शिंदे,  चिकोडी

Related posts: