|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » संस्कृत साहित्यातील अनमोल रत्ने: (11) बाणभट्टाची कादम्बरी

संस्कृत साहित्यातील अनमोल रत्ने: (11) बाणभट्टाची कादम्बरी 

‘कादम्बरी’ हा संस्कृत साहित्यातील महान ग्रंथ किंवा गद्यकाव्य आहे. ह्याचा रचयिता बाणभट्ट आहे. ही जगातील पहिली आणि प्रणयरम्य कादंबरी 7 व्या शतकात लिहिली गेली असे मानले जाते. परंतु कादंबरीचा पूर्वार्ध बाणभट्टाने लिहिला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. उत्तरार्ध त्याचा मुलगा भूषणभट्ट (किंवा पुलिंदभट्ट) याने लिहिला. गुणाढय़द्वारा रचित ब्रुहत्कथेच्या आधारे ही कादंबरी लिहिली आहे. ज्याप्रमाणे आख्यायिकांसाठी हर्षचरितम् प्रमाण मानले जाते, त्याप्रमाणे गद्यकाव्यासाठी कादंबरी प्रमाण मानली जाते. या कादंबरीचे कथानक दीर्घ असून फार गुंतागुंतीचे आहे. ही एक काल्पनिक कथा असून त्यात चंद्रापीड तथा पुंडरिकाच्या तीन जन्मांची कथा आहे. तरीही तिचे थोडक्मयात कथानक असे-

विदिशा नरेश शूद्रकाच्या दरबारात अत्यंत सुंदर अशी एक चांडालकन्या वैशंपायन नावाच्या बोलक्मया पोपटाला पिंजऱयात घेऊन येते. राजाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना तो सांगतो की, त्याची आई मरण पावली आणि त्याच्या पित्याला वाकाटकाने पकडले आणि त्याला जाबाली मुनींच्या शिष्यांनी पकडून आश्रमात आणले. ह्याच घटनाक्रमाच्या दरम्यान जाबालीद्वारा राजा चंद्रापीड आणि वैशंपायनाची गोष्ट येते. उज्जैनीचा राजा तारापीड याचा शुकनास नावाचा बुद्धिमान मंत्री होता. तारापीडचा मुलगा चंद्रापीड आणि शुकनासाचा मुलगा वैशंपायन होय. एकदा दिग्विजयाच्या वेळी चंद्रापीड आच्छोद नावाच्या सुंदर सरोवराकाठी आला असता तिथे त्याला महाश्वेता नावाची अत्यंत सुंदर स्त्री भेटली. तिचा पुण्डरिक नावाचा प्रियकर अकाली कालवश झाल्यामुळे त्याच्या विरहाने ती व्याकूळ झाली होती. तिच्याशी चंद्रापीड बोलत असता तिने आपली सखी कादंबरीशी त्याचा परिचय करून दिला. तिचे अनुपम सौंदर्य पाहून पहिल्याच भेटीत चंद्रापीड तिच्या प्रेमात पडला. परंतु मधेच तारापीडचा त्याला परत येण्याबद्दलचा निरोप आल्यामुळे त्याला परत जावे लागले. पण जाताना त्याने आपली सेविका पत्रलेखा हिला कादंबरीच्या सोबतीला ठेवले. पत्रलेखाकडून चंद्रापीडाला कादंबरीची खुशाली, तिचे विचार कळत असल्याने तो प्रसन्न होता. बाणद्वारा लिहिलेले कथानक इथेच संपते. पुढे त्याचे निधन झाल्याने उत्तरार्ध त्याच्या मुलाने पूर्ण केला. बाणभट्टाच्या रचनेत रसपूर्णता, वक्रोक्ती, दीपक, श्लेष, विरोधाभास इ. अलंकार तसेच अनुप्रासांची रेलचेल दिसते. दुसरे वैशिष्टय़ म्हणजे वाक्मयांची सामासिक रचना! त्याची वाक्मयेच्या वाक्मये समासयुक्त आहेत. बाण हा संस्कृत गद्याचा अनभिषिक्त सम्राट होता. अद्भूत कथावस्तू, रसात्मकता, आश्चर्यजनक शैलीमुळे त्याची ही रचना नेहमीच कुतूहलाचा विषय बनली. त्याची रचना ही सामान्य वाचकाच्या दृष्टीने जटिल आहे.

त्याच्या रचनेतील समास, श्लेष इ. चा अर्थ समजण्यासाठी, कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी तेवढय़ाच तोलामोलाची विद्वत्ता हवी. ती समजून घेण्यासाठी खूप बौद्धिक कष्ट घेण्याची तयारी हवी. एक मात्र खरे की, बाणाने कादंबरीत वर्णन केले नाही अशी एकही भावभावना नाही. तसेच साहित्यिक सौंदर्याच्या दृष्टीने त्याने सर्व प्रकारच्या अभिव्यंजना, अलंकार इ. चा मुक्तहस्ते वापर केला आहे. म्हणूनच एका टीकाकाराने त्याचे वर्णन ‘बाणोच्छिष्टं जगत्सर्वम्’ असे केले आहे, ते अगदी सार्थ आहे!

Related posts: