|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » खुनाची धमकी देत बालकावर अत्याचार

खुनाची धमकी देत बालकावर अत्याचार 

प्रतिनिधी / सांगली

खुनाची धमकी देत बारा वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील चांदणी चौकामधील महापालिकेच्या शाळेतील शौचालयामध्ये शनिवारी दुपारी तीन ते सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पीडित बालकाच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका संशयित युवकास पोलिसांनी अटक केली आहे.

जाफर जमाल नदाफ (वय 19 रा. हनुमाननगर, हनुमान मंदिराच्या पाठीमागे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित मुलगा 12 वर्षाचा आहे. येथील चांदणी चौकामध्ये असणाऱया महापालिकेच्या शाळेमध्ये तो शिक्षण घेतो. शाळेतील शिक्षकांनी त्याला एक प्रोजेक्ट तयार करण्यास सांगितला होता. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो प्रोजेक्टसाठीची बॅटरी बदलण्यासाठी शाळेत गेला होता. त्यावेळी संशयित जाफर तिथे आला.

बालकाला खुनाची धमकी देत त्याला शाळेच्या शौचलयामध्ये नेले. तिथे त्याने जबरदस्तीने बालकावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर संशयित जाफर पळून गेला. दरम्यान झाल्या प्रकाराची माहिती बालकाने वडिलांना सांगितली. त्यांनी तात्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित जाफरच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत गतीने हालचाली करत संशयित जाफर नदाफ याला अटक केली आहे. त्याच्यावर बाललैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 3 सह 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts: