|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बंद पाडलेल्या ‘सारथी’चे काम पूर्ववत सुरु करा; सकल मराठा समाजाचे शरद पवारांना निवेदन

बंद पाडलेल्या ‘सारथी’चे काम पूर्ववत सुरु करा; सकल मराठा समाजाचे शरद पवारांना निवेदन 

प्रतिनिधी / कोल्हापूर

मराठा समाजातील युवक, युवतींच्या शिक्षणासह इतर क्षेत्रातील सर्वांगिण विकासासाठी सुरु करण्यात आलेल्या परंतु सध्या बंद पाडलेल्या ‘सारथी’चे (छत्रपती शाहू महाराज रिसर्च, टेनिंग आणि आणि हय़ुमन डेव्हलमेंट इन्स्टिटय़ूट) काम पूर्ववत सुरु करण्यात यावे. या संस्थेची स्वायतत्ता पूर्ववत कराण्याबरोबरच 500 कोटांचा निधी व पुरेसा कर्मचारी वर्ग देण्यासाठी राज्य सरकारला सूचना कराव्यात, अशी मागणी सकल मराठा समाजच्यावतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान, ‘सारथी’चे लाभार्थी असणाऱया शिवाजी विद्यापीठातील साठ संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीनेही शरद पवार यांना निवेदन सादर करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

   येथील हॉटेल पंचशिलवर शुक्रवारी सकाळी शरद पवारांना विविध संस्था, संघटनांच्यावतीने निवेदने देण्यात आली. यावेळी सध्या गाजत असलेल्या ‘सारथी’ संस्थेच्या प्रश्नावर सकल मराठा समाज आणि लाभार्थी मराठा-कुणबी विद्यार्थ्यांनी पवार यांची भेट घेवून त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या.

    ‘सारथी’ची स्थापना 2018 मध्ये झाली. 3 डिसेंबर 2019 पासून ‘सारथी’ला  राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान पूर्णपणे बंद झाले आहे. कारभार ठप्प झाला आहे. गुप्ता नावाच्या सचिव असणाऱया सनदी अधिकाऱयाने दररोज विविध आदेश काढून गोंधळ निर्माण केला. ‘सारथी’चे काम ठप्प झाल्याने लाभार्थी मराठा, कुणबी युवकांचे आर्थिक, मानसिक खच्चिकरण सुरू झाले आहे. त्यांच्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यांना आधार देण्याची गरज आहे, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी निवेदनाव्दारे पवारांपुढे मांडली.

  व्यवस्थापकीय संचालक निवृत्त आयएफएस अधिकारी परिहार यांनी ‘सारथी’ला दहा महिन्यांच्या काळात उंचीवर नेले. मराठा-कुणबी युवकांना युपीएससी, एमपीएससी परीक्षेसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी दिल्ली, मुंबईत कोचिंग सेंटरच्या रूपाने यंत्रणा उभी केली. त्यांना अनुदान दिले. नेट, सेट परीक्षसाठी प्रशिक्षणाची अनुदानासह सुविधा दिली. बँकींग, मिलिटरी, पॅरा मिलिटरी, स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर, रिसर्च मेथॅडॉलॉजी, ज्युडिशियल सर्व्हिसेस आदी स्पर्धा परीक्षेसाठी तज्ञांचे प्रशिक्षण अर्थात कोचिंग आदी सुविधा दिल्या. पण 3 डिसेंबर पासून ‘सारथी’चे कामकाज ठप्प आहे. गुप्ता नामक सचिवाने ‘सारथी’त हस्तक्षेप सुरू केला. त्यांच्या अहवालाने अनुदान बंद झाले. त्यामुळे आज 3251 मराठा-कुणबी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद झाली आहे. त्यांचे करिअर धोक्यात आहे. प्रशिक्षण, संशोधनासाठी काही जण नोकरी सोडून ‘सारथी’त आले आहेत, त्यांचीही आर्थिक कोंडी झाली आहे. सारथीचे कामकाज सुरु करण्यासाठी गांभिर्याने लक्ष घाला अशी विनंती या निवेदनात वपी आहे. यावेळी प्रताप वरूटे-नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठातील 60 संशोधक विद्यार्थ्यांनीही मांडली गाऱहाणी

‘सारथी’कडून मिळणाऱया शिष्यवृत्तीच्या जोरावर मराठा-कुणबी समाजातील साठ विद्यार्थी, विद्यार्थिंनी शिवाजी विद्यापीठात संशोधन करत आहेत. त्यांनीही शरद पवार यांची भेट घेवून व्यथा मांडल्या. ‘सारथी’ची शिष्यवृत्ती बंद झाल्याने आमचे आर्थिक आणि मानसिक खच्चिकरण सुरू आहे. अभ्यासावर परिणाम झाला आहे. एकदा शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलो तर आमचे आयुष्य बरबाद होईल, अशी भीती व्यक्त करत या विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ पूर्ववत सुरू करून न्याय द्या, अशी विनंती पवारांना केली. यावेळी संदीप मंगारे, गीता देवेकर, सोनाली पाटील, मयूर येलमार आदी विद्यार्थी उपस्थित होते.

सकल मराठाच्या प्रमुख मागण्या

-‘बार्टी’, ‘यशदा’प्रमाणे ‘सारथी’ची स्वायत्तता पूर्वीप्रमाणे कायम ठेवावी.

-महाराष्ट्रात 30 टक्के पेक्षा अधिक असलेल्या मराठा समाजाच्या दुर्बल घटकापर्यंत पोहचण्यासाठी 500 कोटींचा निधी, पुरेसे मनुष्यबळ द्यावे.

-सारथी संशोधक, प्रशिक्षणार्थी यांची शिष्यवृत्ती ताबडतोब सुरु करावी.

-कमी केलेल्या कर्मचाऱयांना पुन्हा सेवेत घ्यावे डी. आर. परिहार यांची व्यवस्थापकीय संचालकपदी पुर्ननियुक्ती करावी.

Related posts: