युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु होऊन आता आठ आठवडय़ांचा कालावधी होत आला आहे. तरीही अद्याप रशियाच्या ताब्यात युक्रेनचे एकही मोठे शहर आलेले नाही. खार्किव्हला रशियाने वेढा घातला होता. तथापि, हे शहर अद्यापही जिंकणे आणि तेथे आपला ताबा स्थायी स्वरुपात निर्माण करणे रशियाला जमलेले नाही, असा दावा युक्रेनने केला आहे. एक प्रकारे या युद्धाने आतापर्यंत रशियाचा अपेक्षाभंग केला आहे. आता माघार घेणेही रशियासाठी कठीण आहे, असे मत अनेक युद्धतज्ञांनी व्यक्त केले असून रशियाच्या सेनेच्या क्षमतेवर रशियातूनच प्रश्नचिन्हे निर्माण होऊ शकतात, असे बोलले जात आहे.
दुसरीकडे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा आणि जर्मनी या पाच मोठय़ा देशांनी युक्रेनला आणखी युद्धसाहाय्य देण्याची तयारी केली आहे. युक्रेनला येत्या काही दिवसांमध्ये आणखी शस्त्रे पुरविण्यात येतील. ही घातक शस्त्रे असतील. विशेषतः रणगाडाविरोधी आणि विमानविरोधी क्षेपणास्त्रे मोठय़ा प्रमाणात पुरविण्यात येतील. तसेच रशियावर आणखी कठोर आर्थिक निर्बंध लादण्याच्या दिशेनेही अमेरिका आणि युरोप यांची पावले पडत आहेत. अमेरिकेने रशियाच्या आर्थिक नाडय़ा अधिक आवळल्या असून रशियाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.