शाळा सुधारणा कमिटीची मागणी
प्रतिनिधी /खानापूर
जामगाव शाळेतील शिक्षकाची प्रतिनियुक्ती इतर शाळेत बदली करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन जामगाव शाळा सुधारणा समिती आणि ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाद्वारे दिले.
जामगाव शाळेत 48 पटसंख्या आहे. सध्या दोन मराठी व एक कन्नड अतिथी शिक्षक आहेत. यापैकी मराठी शिक्षक संदीप मदभावी यांची सायाचेमाळ या शाळेत प्रतीनियुक्ती बदली केली आहे. या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत असलेल्या चापगावकर यांची सीआरपी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जामगाव शाळेत शिक्षकाची कमतरता भासणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. गेली चार वर्षे येथे कन्नड विषय शिक्षक नव्हता. आता अतिथी शिक्षक म्हणून कन्नड शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. ते आठवडय़ातील दोन किंवा तीन दिवस शाळेवर येतात. प्रतिनियुक्ती मराठी शिक्षकाची बदली झाली तसेच सीआरपी म्हणून त्यांची बदली झाल्यास या शाळेत एकाच शिक्षिकेवर पाच वर्गांचा भार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी संदीप मदभावी यांची प्रतिनियुक्ती होणारी बदली रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जामगाव अती दुर्गम भागात असल्याने शिक्षक येण्यास टाळाटाळ करतात. येथील शिक्षकांना इतर ठिकाणी पाठविल्यास जामगाव शाळा शिक्षकांविना राहणार आहे. गटशिक्षणाधिकाऱयांनी याचा गांभीर्याने विचार करावा. यावेळी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष अय्यर, ग्रा. पं. सदस्य दीपक गावकर, एसडीएमसी अध्यक्ष शंकर अय्यर, विजय मादार, दीपिका अय्यर यासह सदस्य व पालकवर्ग उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी यकुंडी यांनी हे डेप्युटेशन योग्य असल्याचे सांगून काही दिवसांनंतर शिक्षक उपलब्ध करून देऊ. सीआरपी म्हणून नियुक्त होणाऱया शिक्षिकेला एसडीएमसीने मोकळीक देऊ नये, असे सांगून जामगाववासियांची बोळवण केली.