बहुजन समाजाच्यावतीने आझाद मैदान येथे आयोजन : पत्रकार परिषदेत गिरीश चोडणकर यांची माहिती
प्रतिनिधी /म्हापसा
ओबीसीच्या विद्यार्थ्यांवर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये होणाऱया अन्यायावर वाचा फोडण्यासाठी येत्या रविवारी म्हणजे 6 नोव्हेंबर रोजी एकूण 28 समाजाच्या जागृत नागरिकांसह सरकार विरोधात पणजीतील आझाद मैदानावर दोन तास धरणे धरणार असल्याची माहिती भंडारी समाजाचे नेते गिरीश चोडणकर यांनी म्हापसा प्रगती संकूल सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी व्यासपीठावर भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, कृष्णनाथ गोवेकर, प्रगती पेडणेकर, रामराव वाघ, सुदीप ताम्हणकर, सुभाष केरकर, रामदास मोर्जे आदी उपस्थित होते. सरकारने याची दखल घेऊन मागण्या मान्य केल्या तर ओबीसींच्या रोषाला सामोरे जावे लागणार नाही अन्यथा 6 रोजी सकाळी 10 ते 12 दरम्यान होणाऱया धरणे आंदोलनात समाजाचा रोष दिसून येईल, असे चोडणकर यांनी पुढे बोलताना सांगितले.
सरकारकडून आरक्षण देण्यास टाळाटाळ : रामराव वाघ
गोमेकॉ व डेन्टल कॉलेजमध्ये अद्याप एसटी, एसी व ओबीसीला अद्याप आरक्षण लागू झालेले नाही. गेल्या 14 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. हा विषय न्यायालयातही गेला आहे तरीही सरकार आरक्षण लागू करत नाही आहे. प्रत्येक वैद्यकीय कॉलेजमध्ये 50 टक्के भारतीय आरक्षण आहे मात्र गोमंतकीयांसाठी हे अद्याप लागू नाही. आरक्षण मिळविण्यासाठी ऍक्शन समिती निवडण्यात येणार असून ती 6 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सर्व ओबीसी समाज प्रतिनिधींनी 6 रोजी सकाळी 10 वा. आझाद मैदानावर जमून आपला निषेध व्यक्त करावा, असे आरक्षण समितीचे संयोजक रामराव वाघ यांनी सांगितले.