भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात विविध जातींचे रंगीबेरंगी मासे दाखल : पर्यटकांचा वाढता ओघ
प्रतिनिधी /बेळगाव
शहरापासून जवळ असलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात वन्यप्राण्यांबरोबर मत्स्यालयाचे आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे विविध जातींचे मासे पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. म्हैसूर प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर विकास करण्यात आलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे, मगर, अस्वल, तरस, मोर, माकडे यासह विविध जातींचे प्राणी व पक्षी दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ प्राणीसंग्रहालयात सुरू केलेले मत्स्यालय आकर्षित करीत आहेत. त्यामुळे वन्यप्रेमींबरोबर मत्स्यप्रेमींची संख्या वाढली आहे.
प्राणीसंग्रहालयाच्या आवारात साकारण्यात आलेल्या मत्स्यालयात विविध जातींचे रंगीबेरंगी मासे ठेवले आहेत. यामध्ये फायटर फिश, क्रोकोडाईल फिश, आरोवाना, किसिन, गौरामी, पिराना आदी जातींच्या माशांचा समावेश आहे. तब्बल 34 एकर परिसरात पसरलेल्या या संग्रहालयात जंगली प्राणी दाखल झाल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यातच आता मत्स्यालयाची भर पडल्याने मत्स्य अभ्यासकांची वर्दळ सुरू झाली आहे.
प्राणीसंग्रहालयाच्या परिसरात वन्यप्राण्यांसाठी होल्डिंगरुम व निवास कोठडीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याप्रमाणे माशांसाठी मत्स्यालय उभारून विविध मासे ठेवले आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाच ठिकाणी विविध जातींचे मासे पाहता येत आहेत. वन्यप्राणी, पक्षी आणि आता विविध जातीचे मासे दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांना, शालेय सहलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वन्यप्राणी आणि विविध जातींचे मासे पाहता येणार आहेत.
कोरोनानंतर अलिकडे प्राणीसंग्रहालयाला भेट देणाऱया पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे संग्रहालयाच्या दैनंदिन महसुलातदेखील वाढ होत आहे. सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे, तरस, मगर यांचा दैनंदिन खर्च अधिक आहे. या प्राण्यांना दिवसाला 10 ते 15 किलो बिफ (मांस) लागते. शिवाय इतर प्राण्यांना चाऱयाची गरज असते. त्यामुळे प्राण्यांचा दैनंदिन देखभाल खर्च अधिक आहे. यासाठी प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाने दत्तक योजना राबविली आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी वन्यप्राण्यांना दत्तक घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.
प्राणीसंग्रहालयाची वेळ
भुतरामहट्टी येथील प्राणीसंग्रहालय मंगळवार वगळता दररोज सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत पर्यटकांना खुले ठेवण्यात येत आहे. तसेच शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशीदेखील प्राणीसंग्रहालय खुले ठेवण्यात येत आहे. प्रौढ व्यक्तींसाठी 40 रुपये तर 5 वर्षांखालील मुलांसाठी 20 रुपये प्रवेश शुल्क आकारणी करण्यात येत आहे. तर मत्स्यालयासाठी 10 रुपये शुल्क आकारणी केली जात आहे. नोकरदार, कामगार व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी संग्रहालय खुले ठेवले जात आहे.
पर्यटकांसह विद्यार्थ्यांनाही होणार लाभ
प्राणीसंग्रहालयात वन्यप्राण्यांबरोबर मत्स्य खात्याने मत्स्यालय सुरू केले आहे. त्यामुळे पर्यटकांना वन्यप्राण्यांबरोबर विविध जातींचे मासे पाहता येत आहेत. शिवाय पर्यटकांबरोबर विद्यार्थ्यांनादेखील याचा लाभ होणार आहे.
– विनोद अंगडी (आरएफओ, भुतरामहट्टी)