क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मराठा मंडळ तांत्रिक महाविद्यालय आयोजित ओजस चषक आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गोगटे महाविद्यालय संघाने मराठा मंडळ पॉलिटेक्निक संघाचा 8-0 असा पराभव करून ओजस चषक पटकावला.
भुतरामहट्टी येथील मराठा मंडळ तांत्रिक महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ओजस चषक फुटबॉल स्पर्धेत 18 संघानी भाग घेतला होता. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जीएसएस महाविद्यालयाचा गोगटे महाविद्यालय संघाने 3-1 असा पराभव केला. कौशिक पाटील, तेजस इंचल व ओंकार शिंदोळकर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात गोगटे संघाने एसजीबीआयटी तांत्रिक महाविद्यालय संघाचा 1-0 असा निसटता पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात कौशिक पाटीलने एकमेव गोल केला.
अंतिम सामन्यात गोगटे महाविद्यालय संघाने मराठा मंडळ पॉलिटेक्निक संघाचा 8-0 असा एकतर्फी पराभव केला. 11, 14 व्या मिनिटाला कौशिक पाटीलने सलग दोन गोल केले. 22 व्या मिनिटाला तेजल इंचलने तिसरा गोल केला. दुसऱया सत्रात 38 व 42 व्या मिनिटाला ओमकार मण्णूरकरने सलग दोन गोल करून संघाला 5-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. 44 व्या मिनिटाला कौशिक पाटीलने 6 वा तर 47 व्या मिनिटाला ओंकार शिंदोळकरने सातवा, 49 व्या मिनिटाला आदित्य संपकाळने आठवा गोल करून 8-0 असा एकतर्फी विजय मिळवून दिला. मराठा मंडळ पॉलिटेक्निक संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या गोगटे संघाला व उपविजेत्या मराठा मंडळ पॉलिटेक्निक संघाला चषक, रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देण्यात आले.