निर्माणाधीन राम मंदिर उडवून देण्याची अल-कायदाची धमकी; पुन्हा मशीद बांधण्याचाही इशारा
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱया बहुप्रतिक्षीत प्रभू श्रीराम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘गजवा-ए-हिंद’ या नियतकालिकातून आंतरराष्ट्रीय जिहादी गट ‘अल-कायदा’ने ‘राम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधली जाईल’ अशी थेट धमकीच दिली आहे. या धमकीसोबतच जिहादी फीडने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच भारतीय मुस्लिमांना जिहादला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवघ्या देशाचे लक्ष लागलेले अयोध्येतील राम मंदिर कधी उघडणार याची तारीख नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषित केली. त्यानंतर लगेचच दुसऱया दिवशी म्हणजेच शुक्रवारी मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील निर्माणाधीन राम मंदिर उडवून देण्याची धमकी अल-कायदा या दहशतवादी संघटनेने दिल्याने अयोध्यानगरी हिटलिस्टवर असल्याचे वृत्त समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनेने ‘गझवा-ए-हिंद’ या त्यांच्या नियतकालिकात यासंबंधीची धमकी दिली आहे. या नियतकालिकाच्या ताज्या अंकात अल-कायदा ही संघटना अयोध्येतील राम मंदिर तोडून त्याठिकाणी मशीद बांधणार असल्याचे म्हटले आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणांना नजिकच्या काळात अधिक सतर्क रहावे लागणार आहे.
धमकीवजा इशारा
‘गझवा-ए-हिंद’ या नियतकालिकाच्या संपादकीय मजकुरात धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. ज्याप्रकारे बाबरी मशिदीच्या ढाच्यावर राम मंदिर बांधण्यात येत आहे. ते पाडले जाईल. मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशीद बांधली जाईल. या सगळय़ासाठी बलिदान हवे असल्यामुळे भारतातील सर्व मुस्लिमांनी या जिहादमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नियतकालिकातून करण्यात आले आहे. मासिकातील हा मजकूर भारतीय वातावरणाशी परिचित असलेल्या व्यक्तीने लिहिलेला असल्याची चर्चा आहे.
अल-कायदाने भारतीय मुसलमानांना विशेष आवाहन केले आहे. या आवाहनानुसार, आपण अनेक दशकांपासून नुकसान झेलले आहे. हे जीवन जिहादसाठी वापरले असते तर एवढे नुकसान झाले नसते. धर्मनिरपेक्षता ही नरकासमान आहे. हे भारतीय मुस्लिमांनी लक्षात ठेवावे. हिंदू-मुस्लीम भाईचारा हे धोकादायक ठरु शकते, असे नमूद करण्यात आले आहे.