जोरदार पावसामुळे दुपारनंतर मंदिरातून गर्दी : विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
दुसऱया श्रावण सोमवारी शहरातील शिवालयातून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. संततधार पावसामुळे दुपारनंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यानिमित्त मंदिरातून रुद्राभिषेक, लघुरुद्राभिषेक, पंचामृताभिषेक, महाआरती, पूजा व तीर्थप्रसादाचे वाटप केले. तसेच मंदिरांच्या शेजारी फुले, हार, बेलपत्रे व पूजा साहित्यांची विक्री झाली.
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे प्रार्थनास्थळांवरही निर्बंध आले होते. त्यामुळे भाविकांना मंदिरात दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा कोरोनाची लाट ओसरल्याने महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. शहरातील महादेव मंदिर, बिस्कीट महादेव, वीरभद्र देवस्थान, मल्लिकार्जुन देवस्थान यासह इतर मंदिरांतून भाविकांची वर्दळ वाढली होती. सकाळी पावसाने संततधार सुरू झाल्याने भाविकांनी दुपारीच दर्शनासाठी प्राधान्य दिले. तर काही ठिकाणी पावसामुळे नागरिकांची वर्दळ कमी पाहायला मिळाली.
श्रावणातील दुसरा सोमवार आणि पुत्रदा एकादशीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, अतिपावसामुळे मंदिराकडे जाणाऱया नागरिकांना अडथळा निर्माण झाला. मंदिरातून मूर्ती आणि शिवलिंगावर फुलांची आकर्षक आरास केली होती. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमदेखील पार पडले. मागील आठवडय़ात पहिल्या श्रावण सोमवारीही दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया कपिलेश्वर मंदिरासह इतर सर्व महादेव मंदिरांतून भाविकांची गर्दी झाली होती. श्रावण महिना पवित्र मानला जात असल्याने दर्शन घेणाऱया भाविकांची संख्या अधिक असते. विशेषतः दर सोमवारी शिवालयातून दर्शनासाठी वर्दळ वाढलेली असते. दुसऱया सोमवारीदेखील भाविकांची मंदिरातून वर्दळ पाहायला मिळाली.
कणबर्गी सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
कणबर्गी येथे डोंगरमाथ्याच्या कुशीत वसलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील धबधबा प्रवाहित झाला असून सध्या हा धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे येथे धबधबा पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. गावच्या उत्तरेकडे असलेल्या डोंगरमाथ्यावर निसर्गरम्य वातावरणामध्ये श्री सिद्धेश्वर मंदिर वसलेले आहे. या मंदिर परिसरात केवळ अतिवृष्टी झाल्यानंतरच धबधबा प्रवाहित होतो. साधारण तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे हा धबधबा प्रवाहित झाला होता. त्यानंतर आता पुन्हा हा धबधबा प्रवाहित झाल्याने भाविकांसाठी ही एक पर्वणीच आहे. डोंगरमाथ्यावरून कोसळणारा धबधबा सध्या सर्वांना आकर्षित करत आहे. श्रावण सोमवारनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. त्यामुळे भाविकांना धबधब्याचा आनंदही लुटता आला.