प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव येथील इन्प्रंट्री स्कूलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल पी. एन. अनंतनारायण यांनी सोमवारी लोकमान्य सोसायटीला सदिच्छा भेट दिली. गुरुवार पेठ, टिळकवाडी येथील कार्यालयाला भेट देऊन त्यांनी सोसायटीविषयी माहिती जाणून घेतली. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी अनंतनारायण यांचा सत्कार केला.
ले. जनरल पी. एन. अनंतनारायण म्हणाले, 1985 मध्ये यंग ऑफिसर्स कोर्ससाठी बेळगावमध्ये आलो तेव्हापासून या शहराच्या प्रेमात आहे. बेळगावला नैसर्गिक वरदान मिळाले असल्याने येथे काम केल्यामुळे एक समाधान मिळते. देश आझादी का अमृतमहोत्सव साजरा करत असून आपली वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेऊन देशाचा विचार प्रथमतः करावा. जात, धर्मापलिकडे जाऊन आम्ही भारतीय आहेत, ही मूल्ये रुजविली तर देशाची प्रगती दूर नाही, असे विचार त्यांनी मांडले.
किरण ठाकुर यांनी अनंतनारायण यांचे स्वागत करत सोसायटीला भेट दिल्याबद्दल आभार मानले. बेळगाव हे एक थंड हवेचे ठिकाण असून ब्रिटिशांना या शहराचे आकर्षण असल्यामुळे मराठा लाईट इन्फंट्री येथे आणण्यात आली. स्वातंत्र्यलढय़ात बेळगावचे योगदान महत्त्वाचे आहे. तरुण भारतचा स्वातंत्र्य लढय़ात सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. सीईओ अभिजीत दीक्षित यांनी स्वागत केले. निवृत्त कर्नल दीपककुमार गुरुंग यांनी आभार मानले. सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक डी. पी. वागळे, सुबोध गावडे, सोसायटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.