जळगाव / प्रतिनिधी :
देशात डॉक्टरांची कमतरता असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. मात्र सद्यस्थितीला एक लाख डॉक्टर बेरोजगार आहेत. इंडियन मेडीकल असोसिएशन हे स्वयंरोजगाराचे केंद्र असून वैद्यकीय क्षेत्रातील तरूण डॉक्टरांच्या प्रत्येक अडचणीत आयएमए त्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन इंडियन मेडीकल असोसिएशन हेडक्वार्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन यांनी केले.
जळगाव इंडियन मेडीकल असोसिएशन आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित आरोग्य सेवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. असोकन बोलत होते. याप्रसंगी इंडियन मेडीकल असोसिएशन हेडक्वार्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आयएमए हेडक्वॉटरचे उपाध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, डॉ. जयेश लेले आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर, महाराष्ट्र आयएमचे अध्यक्ष रवींद्र कुटे, आयएमए महाराष्ट्र सचिव डॉ. संतोष कदम, डॉ. मंगेश पाटे, डॉ. सत्येन मंत्री, जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उपस्थित होते.
डॉ. आर. व्ही. असोकन म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात सरकारकडून जे काही धोरण ठरविले जाते. त्यात अनेक विषयांवर सरकारशी चर्चा करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या तरूण डॉक्टरांसाठी त्यांचा सहकारी हाच त्यांचा भाऊ, बहिण असल्याचे कायम लक्षात ठेवावे. प्रत्येक अडचणीत हाच सहकारी तुम्हाला मदत करणारा आहे. वैद्यकीय क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर अनेक संधी उपलब्ध आहेत. देशात एक लाख डॉक्टर जॉबच्या प्रतिक्षेत आहेत. इंडियन मेडीकल असोसिएशन हे स्वयंरोजगार केंद्राचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. असोकन यांनी पदानुक्रम आणि वर्चस्व, उद्यमशीलता, वैद्यकीय क्षेत्रातील वारसा, कामाच्या ठिकाणी होणारी हिंसा, वैद्यकीय विद्यार्थी आणि तरूण डॉक्टरांसमोरील आव्हाने यावर मार्गदर्शन केले. तरूण डॉक्टर्स हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. तुमचे पालक म्हणून आयएमए सदैव तुमच्या पाठीशी असल्याचेही डॉ. असोकन यांनी यावेळी स्पष्ट केले.