ग्राम वन, कर्नाटक वनमध्ये अर्ज स्वीकृती
प्रतिनिधी / बेळगाव
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बसपास प्रक्रियेला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. बेळगाव वन, कर्नाटक वनमध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकृती सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या पासची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. या काळात विद्यार्थ्यांना नवीन बसपास काढून घेणे आवश्यक आहे.
शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की दरवर्षी सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र, मागील दोन वर्षात कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते. त्यामुळे बसपास प्रक्रिया काहीशी विस्कळीत झाली होती. यंदा शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू झाले आहे. त्याबरोबरच परिवहननेही बसपास प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
मागील दोन वर्षात बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. विद्यार्थ्यांना बसपाससाठी ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. त्यानंतर बसपासची पूर्तता केली जात आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना बसपाससाठी सेवा सिंधू पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. विशेषत: यंदा बसपासची सुविधा ग्राम वन व कर्नाटक वनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसपास मिळविणे सोयीस्कर होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करताना रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी एखादी प्रत व प्रवेश शुल्क भरलेली पावती, फोटो व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
इयत्तेनुसार बसपासचा दर
वर्ग बसपासचा दर
प्राथमिक शाळा (पहिली ते सातवी) 150 रुपये (10 महिन्यांसाठी)
माध्यमिक शाळा (आठवी ते दहावी) 750 रुपये
पदवी-पदव्युत्तर 1050 रुपये
आयटीआय (सामान्य विद्यार्थी) 1310 रुपये
व्यावसायिक कोर्स
(सामान्य विद्यार्थी) 1550 रुपये
नाईट कॉलेज/पीएचडी 1350 रुपये