कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस; कानपूर आयआयटीचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे प्रमुख पाहुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाचा 59 वा दीक्षांत समारंभ आज (दि. 29) सकाळी 11.45 वाजता महाराष्टाचे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राज्यपाल रमेश बैस ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. कानपूर भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) माजी संचालक डॉ. संजय धांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राजमाता जिजाऊ सभागृहात होणाऱ्या दीक्षांत सोहळ्यात प्रत्यक्ष आणि पोस्टाने 66 हजार 457 विद्यार्थ्यांना पदवीप्रमाणपत्र प्रदान केली जाणार आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस उपस्थित राहणार होते. परंतू तांत्रिक अडचणीमुळे आपण उपस्थित राहू शकत नाही, असा संदेश सोमवारी रात्री उशिरा कुलगुरू यांना मिळाला. याची माहिती मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यवस्थापन सदस्यांना दिली. त्यामुळे राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभ घेण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. या दीक्षांत समारंभात 16 हजार 594 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तर 49 हजार 863 विद्यार्थ्यांना पोस्टाने एकूण 66 हजार 457 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. पीएच. डी. पदवी 300 स्नातकांपैकी 46 स्नातकांना प्रत्यक्ष प्रदान केली जाईल. तसेच यंदा राष्ट्रपती सुवर्णपदकाने महेश बंडगर तर कुलपती सुवर्णपदकाने सोहम जगतापयांना गौरविण्यात येणार आहे. यंदा 33 हजार 785 मुली तर 32 हजार 672 मुल पदवी घेणार आहेत. त्यामुळे मुलांपेक्षा एक ते दीड टक्का ज्यादा मुलींचे प्रमाण आहे. दीक्षांत समारंभाची संपूर्ण तयारी झाली असून, पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी 43 स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलवर विद्यार्थ्यांनी पदवीप्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरूढ पुतळ्याजवळ फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्यांना परवानगी दिली आहे. दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी विद्युत रोषणाई पाहून फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.