पुणे / प्रतिनिधी :
केंद्र प्रमुखांच्या रिक्त पदांवर भरतीचा मुहूर्त लागला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेद्वारे 2 हजार 384 रिक्त पदांची भरती केली जाणार असून, त्यासाठीची परीक्षा आयबीपीएस या कंपनीमार्फत जूनच्या शेवटच्या आठवडय़ात ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी 15 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवणे आणि शिक्षणाचा दर्जा उचावण्यासाठी 4 हजार 860 केंद्र प्रमुखांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी आदी कारणांनी बहुसंख्य पदे रिक्त आहेत. केंद्र प्रमुखांची पदे रिक्त असल्याने अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे पदोन्नतीने आणि 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या कोटय़ाच्या मर्यादेत भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे 2 हजार 384 पदांसाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा होणार आहे. परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती कालावधी याबाबतची माहिती अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्ध केली.
विभागीय भरतीअंतर्गत राज्यात सर्वाधिक 153 पदे पुणे जिल्ह्यात, तर सर्वात कमी भंडारा जिल्ह्यात 30 जागांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या जवळच्या ठिकाणी परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनाच ही परीक्षा देता येणार आहे. अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षे, तर किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.