पुढील आठवडय़ात नाव निश्चित होईल : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा अद्याप कायम असून गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटून गोव्यात परतले, तरही तो प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुढील आठवडय़ात पाटकर यांना पुन्हा एकदा दिल्ली पाचारण करण्यात आले असून तेव्हा विरोधी पक्षनेता ठरेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली असली तरी सध्या मायकल लोबो हेच त्या पदावर कार्यरत असल्याचे विधानसभेतून स्पष्ट झाले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटकर यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करीत असून पैशांचे आमिष दाखवून, धमक्या देण्याचे प्रकार चालू आहेत. काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत, असा दावा पाटकर यांनी केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरी लोकशाहीचे रक्षण करावे, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे. पुढील आठवडय़ात विरोधी पक्षनेतेपदाची निवड होण्याची शक्यता पाटकर यांनी बोलून दाखवली आहे. पक्षश्रेष्ठींशी भेट झाली असून गोव्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली. पुढील आठवडय़ात पुन्हा या प्रश्न दिल्लीत पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करणार असल्याची माहिती पाटकर यांनी दिली.