सभापती रमेश तवडकर यांच्यावर टीका
प्रतिनिधी /पणजी
आगामी नवीन वर्ष 2023 मधील जानेवारीत होणाऱया गोवा राज्य विधानसभेच्या 4 दिवसीय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर आमदारांच्या प्रश्नांना फक्त गेल्या 5 वर्षातीलच माहिती मिळणार असल्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे विरोधी आमदारांची गोची झाली असून त्यांनी सभापती रमेश तवडकर यांनी जारी केलेल्या या बंधनाचा निषेध नोंदवला आहे.
सभापतींच्या या कृतीमुळे 5 वर्षाच्या पुर्वीची माहिती आमदारांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा नवीन बंधनकारक नियम कशासाठी लागू करण्यात आला ते कळायला मार्ग नाही परंतू विरोधी पक्षांचा आवाज दाबून टाकण्याची ही खेळी असल्याची प्रतिक्रीया विरोधी पक्षांतर्फे प्रकट करण्यात आली आहे.
गोवा विधानसभा कामकाज नियम 307 च्या आधारे उपनियम 37/21 अंतर्गत सभापतींनी हे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे ज्या आमदारांनी 5 वर्षापुर्वीची माहिती मागणारे प्रश्न विचारले असतील तर ते फेटाळले जातील किंवा त्यांना उत्तरे मिळणार नाहीत. या नियमामुळे 2018 पुर्वीची माहिती आमदारांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी बंधने यापुर्वी कोणत्याही सभापतींनी घातली नव्हती. विरोधी पक्षीय आमदारांनी या बंधनाचा तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. कायदेतज्ञांनी देखील हे बंधन चुकीचे, अयोग्य अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. सभापती चुकीच्या पायंडा पाडत असल्याची टीका त्यांनी केली आहे.