दुपारी 12 ते 2 पर्यंत आधार जोडणी करण्याची शिक्षण खात्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक लिंक करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील 4 लाख 72 हजारांपैकी केवळ 94 हजार मतदारांचे आधार लिंक पूर्ण झाले आहे. बीएलओ आणि नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षण खात्याकडून विशेष आदेश बजाविण्यात आला आहे. दि. 29 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरपर्यंत दुपारी 2 तास बीएलओंना आधार लिंक कामासाठी वेळ द्यावा लागणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारयादीला आधार क्रमांक लिंक करण्यासाठी महापालिकेकडून मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात आणि महाविद्यालयांमध्ये जागृती मोहीम राबविण्यात आली. तरीदेखील प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेच्या महसूल विभागाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आधारकार्ड आणि क्रमांक घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण नागरिकांचाच प्रतिसाद मिळत नाही, अशी स्थिती आहे. तसेच सदर कामाची जबाबदारी बुथ लेव्हल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांकडूनही सहकार्य मिळत नाही. त्यामुळे आधार लिंकच्या कामात प्रगती झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
बेळगाव महानगरपालिका व्याप्तीमध्ये येणाऱया दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात 4 लाख 72 हजार मतदार असून, यापैकी केवळ 20 टक्के मतदारांचे ओळखपत्र लिंक करण्यात आल्याची माहिती महापालिका कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.
आधार लिंक करीत घरोघरी जाऊन आधार क्रमांक घेण्याची जबाबदारी बीएलओंवर सोपविण्यात आली आहे. पण शिक्षक सहकार्य करीत नसल्याने महापालिकेकडून शिक्षण खात्याला आणि निवडणूक विभागाला पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने या कामासाठी विशेष आदेश बजावला आहे. शिक्षण कार्य महत्त्वाचे असून, त्यासोबत निवडणूक विभागाचे कामही महत्त्वाचे आहे.
त्यामुळे दि. 29 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत आधार क्रमांक जमा करून जोडणीचे काम करण्यासाठी वेळ द्यावा, असा आदेश त्यांना बजावला आहे. जर ही जबाबदारी बीएलओंनी काही कारणांनी टाळल्यास त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा आदेश क्षेत्र शिक्षणाधिकाऱयांनी बजावला आहे. त्यामुळे बीएलओंना आता आधार लिंकची जबाबदारी टाळता येणार नाही. आगामी काळात आधार लिंकचे काम पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे.