आमदार विजय सरदेसाई यांचा इशारा : कर्नाटकात सुरू असलेल्या कामांची केली पाहणी
प्रतिनिधी / पणजी
म्हादई नदीवर कर्नाटक सरकारने चालवलेली विविध विकासकामे, बांधकाम प्रकल्पाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेऊन काहीतरी कृती करावी नाहीतर गोवा राज्य म्हादईला कायमचे मुकणार असल्याचा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षप्रमुख, आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे. गोमंतकीय जनतेला भविष्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल, असेही सरदेसाई यांनी बजावले आहे.
सरदेसाई यांनी कर्नाटकातील चोर्ला, कणकुंबी तसेच कळसा भांडुरा व इतर विविध ठिकाणी भेटी देऊन तेथे म्हादई नदीवर चालू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर हे देखील त्यांच्यासमवेत होते. त्यांनी संपूर्ण परिस्थिती सरदेसाई यांना कथन केली आणि तेथे विविध ठिकाणी चालू असलेली कामेही त्यांना दाखवली. कर्नाटक सरकारने केलेल्या कामांबाबत गोवा सरकार काहीच लक्ष देत नाही, असे सांगून सरदेसाई यांनी आश्चर्य व्यक्त केले.
गोवा सरकार मूग गिळून गप्प
कर्नाटक सरकारच्या म्हादई नदीवरील विविध कामांना आक्षेप घेण्यास गोवा सरकार अपयशी ठरले असून मूग गिळून गप्प बसल्याची प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली. तेथील विविध कामांची छायाचित्रे त्यांनी टिपली असून ती मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिवांना पाठवली असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.
आंदोलन उभे करुन पणजीत विराट सभा घेणार
सरदेसाई यांनी म्हादईचा विषय मुख्य सचिवांकडे नेला असून त्यांच्याशी चर्चा केली आणि म्हादई वाचवण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी केली. कर्नाटकने म्हादईचे संपूर्ण पाणी वळवले तर त्याचा जबर फटका केवळ उत्तर गोव्यालाच नव्हे तर दक्षिण गोव्यासह संपूर्ण राज्यालाच बसणार असून पाण्यासाठी हाल होतील. पाणी प्रकल्पांना देखील पाणी मिळणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली. या प्रकरणी आपण संपूर्ण गोव्यात जनजागृती करुन म्हादई विषयावर आवाज उठविणार असून आंदोलन उभे करणार आहे तसेच पणजीत विराट सभा घेण्याचाही इरादा त्यांनी व्यक्त केला.