लंकेच्या 378 धावांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तान दिवसअखेर 7 बाद 191
येथील दुसऱया कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 378 धावांचा डोंगर रचल्यानंतर श्रीलंकेने पाकिस्तानला पहिल्या डावात 7 बाद 191 धावांवर रोखून धरले. दिवसाच्या प्रारंभी फक्त 4 गडी हाताशी असताना सुरुवात करणाऱया लंकेने अंतिम टप्प्यातही उत्तम मोर्चेबांधणी केली.
गॅले इंटरनॅशनल स्टेडियमवरील या लढतीत सोमवारी दुसऱया दिवसाअखेर पाकिस्तानचा यासीर शाह 13 धावांवर नाबाद राहिला. आघा सलमान 62 धावांवर बाद झाल्यानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
श्रीलंकेने सोमवारी 6 बाद 315 या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर यात आणखी 63 धावांची भर घातली. 42 धावांवरुन पुढे खेळणाऱया डिकवेलाने 22 वे कसोटी अर्धशतक साजरे केले. रमेश मेंडिसने 4 चौकार व 1 षटकारासह 52 चेंडूत 35 धावा केल्या. पाकिस्तानतर्फे नसीम शाह (3-58), यासीर शाह (3-83) यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद नवाझने 80 धावात 2 बळी घेतले. नौमन अलीला एका बळीसाठी 64 धावा मोजाव्या लागल्या.
प्रत्युत्तरात पाकिस्तानतर्फे आघा सलमानने सर्वाधिक 62 तर इमाम हकने 32 धावांचे योगदान दिले. रिझवान व आलम यांनी प्रत्येकी 24 धावा केल्या. लंकेतर्फे रमेश मेंडिसने 42 धावात 3 तर प्रभात जयसूर्याने 59 धावात 2 फलंदाज बाद केले. धनंजया व फर्नांडो यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका पहिला डाव ः सर्वबाद 378.
पाकिस्तान पहिला डाव ः 69.4 षटकात 7 बाद 191 (आघा सलमान 126 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 62, इमाम-उल-हक 54 चेंडूत 4 चौकारांसह 32, रिझवान व फवाद आलम प्रत्येकी 24 धावा, अवांतर 8. रमेश मेंडिस 18 षटकात 3-42, प्रभात जयसूर्या 2-59, धनंजया डीसिल्व्हा, असिता फर्नांडो प्रत्येकी 1 बळी).